Lokmat Sakhi >Food > वसू बारसेला मायेनं करावा असा सुगंधी पदार्थ -कोट्टीगे! घरभर पसरणाऱ्या सुगंधानं दिवाळीचं स्वागत

वसू बारसेला मायेनं करावा असा सुगंधी पदार्थ -कोट्टीगे! घरभर पसरणाऱ्या सुगंधानं दिवाळीचं स्वागत

विस्मरणातले दिवाळी फराळ पदार्थ : मुळ्ळू सौते कोट्टिगे हा पदार्थ केरळ-कर्नाटकच्या किनारपट्टीवर वसुबारसेला करतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2023 07:23 PM2023-11-09T19:23:26+5:302023-11-10T18:26:47+5:30

विस्मरणातले दिवाळी फराळ पदार्थ : मुळ्ळू सौते कोट्टिगे हा पदार्थ केरळ-कर्नाटकच्या किनारपट्टीवर वसुबारसेला करतात.

diwali special traditional diwali recipes easy to make and delicious Diwali faral Maharashtrian recipes best traditional Diwali recipes-Mullu Saute Kottige | वसू बारसेला मायेनं करावा असा सुगंधी पदार्थ -कोट्टीगे! घरभर पसरणाऱ्या सुगंधानं दिवाळीचं स्वागत

वसू बारसेला मायेनं करावा असा सुगंधी पदार्थ -कोट्टीगे! घरभर पसरणाऱ्या सुगंधानं दिवाळीचं स्वागत

Highlightsकोट्टीगे शिजताना घरभर तवस आणि केळीच्या पानांचा सुगंध दरवळतो. फोटो : सौजन्य गुगल

- साधना तिप्पनाकजे

मुळ्ळू सौते कोट्टिगे. नाव वाचल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की हा पदार्थ मराठी नाही. या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्राबाहेरही दिवाळीत पूर्वी केल्या जाणाऱ्या काही पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात होते. ग्रामीण भागात आजही घरी गाय असणं हे भरभराटीचं लक्षण मानतात. साहजिकच आहे, गाय असली की घरचं दूध मिळतं मग त्यापासून दही, लोणी, तूप ह्या गोष्टी मिळतात. शिवाय तिच्या शेणाचा उपयोग खत आणि गोबरगॅसकरताही होतो. कुटुंबातल्या सदस्याप्रमाणं गायीचा सांभाळ केला जातो आणि गायीचीही आपल्यावर तशीच माया जडते. तर वसुबारसला आपल्याकडच्या गोधनाची पूजा करतात. तिच्याकरता विशेष पदार्थ करून तिला खाऊ घालतात.

(Image : google)

कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीच्या सीमेवरच्या भागात वसुबारसच्या दिवशी मुळ्ळू सौते कोट्टिगे तयार करत असत. श्रावणापासून दारातल्या मांडवाला मुळ्ळू सौते लागायला सुरुवात होते. साधारण दिवाळीपर्यंत या मुळ्ळू सौते येतात. मुळ्ळू सौते म्हणजे तवसं किंवा मेडी काकडी. म्हणजेच आकारानं जाडजूड आणि चांगली फूटभर लांबीची काकडी. कोकणातही या काळात ही काकडी येते. मुळ्ळू म्हणजे काटे. या काकडीला हलके काटे असतात. त्यामुळेच हिला मुळ्ळू सौते असं म्हणतात. स्थानिक कन्नड बोलीभाषेत आणि तुळूत पानात वाफवलेल्या पदार्थांना कोट्टीगे म्हणतात. मुळ्ळू सौते कोट्टीगेकरता तवसाची सालं तासून घ्यायची. तिच्या आतल्या बिया काढायच्या. या तवसाला बारीक चिरून घ्यायचं. किसायचं नाही. चिरलेली काकडी गूळ घालून शिजवायची. म्हणजे तिला पाणी सुटणार नाही. या भागात नारळ मुख्य पिक असल्यानं कोट्टीगेत ओलं खोबरं घालायलाच हवं. तर काकडी गूळाचं मिश्रण तयार झालं की त्यात ओलं खोबरं घालायचं. तांदूळ साधारण दोन तास पाण्यात भिजवायचे.


तांदळातलं पाणी उपसून त्यांना रवाळ वाटायचे. काकडी, गूळ आणि खोबऱ्याच्या मिश्रणात वाटलेले तांदूळ छान मिक्स करायचे. कोट्टीगेमध्ये तांदळापेक्षा काकडीचं प्रमाण जास्त हवं. नाहीतर कोट्टीगेला मजा येत नाही. हे मिश्रण सरबरीत म्हणजे चमच्यानं पडेल असं हवं. खूप घट्ट किंवा पातळही नको. केळीच्या पानांच्या तुकड्यामध्ये हे मिश्रण भरायचं. या पानांची अलगद घडी करून पुडी बांधायची. पूर्वी औषधांच्या पुड्या बांधायचे ना अगदी तशाच पुड्या बांधायच्या. पुड्या बांधायला घ्यायच्या आधी मोदकपात्रात पाणी उकळवायला ठेवायचं. पाण्याला उकळ आला की या पीठ भरलेल्या पुड्या भरभर मोदकपात्रात एकावर एक रचायच्या. सगळ्या कोट्टीगे रचून झाल्या की मोदकपात्राचं झाकण बंद करून मंद आचेवर या कोट्टीगे वाफवायच्या. कोट्टीगे शिजताना घरभर तवस आणि केळीच्या पानांचा सुगंध दरवळतो. 

गायींचा गोठा जवळ असेल तर त्यांना या सुगंधाची वर्दी जातेच. एकदा का त्यांना वर्दी मिळाली की मग अजिबात धीर नसतो. गोठ्यातून हंबरायला सुरवात होते, लवकर लवकर कोट्टीगे आणा. घरातून “आलो आलो”ची साद येते. मग घरातले सर्व सदस्य गोमातेची पूजा करून तिला मुळळू सौते कोट्टीगे खाऊ घालतात. गोमातेचं मनसोक्त खाऊन झाल्यावर ती प्रेमानं सर्वांना आवाज देते. घरातले सदस्य मग आत येऊन मुळ्ळू सौते कोट्टीगे खातात.

(लेखिका खाद्यपरंपरा अभ्यासक-मुक्त पत्रकार आहेत.)
 

Web Title: diwali special traditional diwali recipes easy to make and delicious Diwali faral Maharashtrian recipes best traditional Diwali recipes-Mullu Saute Kottige

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.