Join us  

बाहेरुन कडक आणि आतून खुसखुशीत तांदळाची गोड बोरं, फराळाचा पारंपरिक पदार्थ - एकदा खाऊन पाहाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 4:58 PM

विस्मरणातले दिवाळी फराळ पदार्थ : दिवाळीत बोरं कोण खातं असा प्रश्न पडला असेल तर ‘तांदळाची गोड बोरं’ खायलाच हवीत!

ठळक मुद्देदिवाळीच्या फराळात एक साधा, सोपा, सुटसुटीत, कमी जिन्नसात होणारा पदार्थफोटो : सौजन्य गुगल

साधना तिप्पनाकजे

महाराष्ट्रात दिवाळीतला फराळ हे शास्त्र मानलं जातं. आता पूर्वीइतका घरोघरी मोठ्या प्रमाणात फराळ तयार होत नसला तरी काही निवडक पदार्थ तयार केले जातातच. पूर्वी मोठ्या प्रमाणात फराळ तयार करायचं कारण घरातचं माणसं फार, नातेवाईकांकडं आणि शेजाऱ्यांकडं फराळाच्या ताटाची देवाणघेवाण. हे देवाणघेवाणीचं शास्त्र खूप अजब असतं ना. म्हणजे एकाचवेळी छान असतंही आणि नसतंही. अमकीच्या चकलीला काय सुंदर काटे पडलेत, तमकीच्या चकल्या वातड झाल्या. अमकीचं बेसन-रवा कच्चा, लाडवात तूपच नाही तमकीची करंजी पोकळ तर ढमकीचा सगळा फराळच सुरेख. अशा विविध कौतुकसोहळ्यातून ही देवाणघेवाणीची पूर्तता व्हायची. प्रत्येकाच्या फराळावर त्यांच्या गावची छाप असते. फराळामध्ये नेहमीचे चकली, चिवडा, शेव, लाडू, शंकरपाळ्या, करंज्या, अनारसे हे पदार्थ असतातच. पण शहरांमध्ये विविध गावांची बिऱ्हाडं असल्यानं या देवाणघेवाणीमुळं त्या त्या गावचे विशेष पदार्थ चाखता येतात. 

(Image : Google)

माझ्या बाबांचं आजोळ रोहा. माझी आजी आणि आत्या दिवाळीच्या फराळामध्ये ‘बोरं’ करायच्या. बोरं तर झाडाला लागतात असं काहीजण म्हणतील. पण ही आहेत तांदळाची गोड बोरं. दोन्ही आत्यांकडचा फराळाचा डबा आला की, मला नेहमीच्या फराळात इंटरेस्ट नसायचा. माझे डोळे त्यातल्या बोरांवरच असायचे. आई आणि इतर काकूंच्या माहेरी ही बोरं करत नसल्यानं त्यांनी कधी ही बोरं केली नाहीत. मी ४-५ वर्षांपूर्वी आत्याला विचारून पहिल्यांदा ही बोरं केली. या बोरांनी मला माझ्या लहानपणात नेलं. लेकीलाही ही बोरं खूप आवडली.

ही बोरं तयार करणंही खूप सोपं आहे. सामानही फारसं लागत नाही. तांदळाचं पीठ, गूळ, तीळ, पाणी आणि तेल एवढंच सामान पुरे. पाणी थोडं गरम करून घेऊन त्यात गूळ विरघळवायचा. गुळाचा पाक करायचा नाही. यात बसेल इतकं तांदळाचं पीठ घालायचं. चमचाभर पांढरे तीळ आणि कणभर मीठ घालायचं. हे पीठ छान मळून घ्यायचं. फार सैल किंवा घट्टही नको, मध्यम हवं. आता हाताला तेल लावून या पीठाचे लहान गोळे वळायचे. साधारण मिनी गुलाबजामच्या आकाराचे. कढईत कडक तापलेल्या तेलात मंद आचेवर ही बोरं छान तळून घ्यायची. बाहेरुन कडक आणि आतून खुसखुशीत अशी ही बोरं चवीला खूप सुंदर लागतात.

मी एकदा या बोरांच्या पिठात तिळाऐवजी अर्धा चमचा बडिसोपची भरड घातली होती. त्यांची चवही मला आवडली होती. दिसायला फळातल्या बोरांसारखा आकार आणि रंग असल्यानं यांना बोरं नाव पडलं असेल का? किंवा एखाद्या लहानग्यानं बिनमौसम बोरांचा हट्ट आपल्या आईकडं धरला असेल आणि या तांदळाच्या बोरांचा जन्म झाला असावा असं वाटतं. काही का असेना दिवाळीच्या फराळात एक साधा, सोपा, सुटसुटीत, कमी जिन्नसात होणारा पदार्थ मिळाला. 

(लेखिका खाद्यपरंपरा अभ्यासक-मुक्त पत्रकार आहेत.)

 

टॅग्स :दिवाळी 2023अन्न