- शीतल मोगल, (आहारतज्ज्ञ)
भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अनन्य साधारण महत्त्व आहे, कारण हे ऋतूमानाप्रमाणे येतात. प्रत्येक सणाला खाल्ले जाणारे पदार्थ हे त्या-त्या ऋतूप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायकच असतात. श्रावण महिना ते नवरात्र, याकाळात उपवासाचे महत्त्व असते, कारण त्या ऋतूत शरीराची चयापचय क्रिया मंदावलेली असते. त्यामुळे त्यावेळी उपवासाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. उपवास योग्य पद्धतीने केले, तर वजनही आटोक्यात येते.
पण आता लागलीय थंडीची आणि दिवाळीची चाहूल. दिवाळी म्हटलं की, आकाश कंदील-दिवे आणि त्याचसोबत येतो दिवाळीचा फराळ. दिवाळी फराळाचे काही पदार्थ वर्षातून एकदाच केले जातात. वातावरणात गारवा आल्याने शरीराची चयापचय क्रिया वाढते, त्यामुळे स्निग्ध पदार्थ तळलेले पदार्थ शरीर पचवू शकते. हवेत कोरडेपणा आल्यामुळे दिवाळीचा स्निग्ध फराळ शरीराला मानवतोही.
दिवाळीच्या फराळातलं पोषण...
१. फराळामध्ये प्रामुख्याने लाडू, चकली, चिवडा, अनारसे होतात. फराळाची राणी करंजी असते. करंजीमध्ये आपण खोबरे भाजून पिठीसाखर व वेलची पावडर घालतो. खोबरं शरीराला नैसर्गिक तेलाचं पोषण देतं. थंडीत त्वचेला तजेलदार ठेवतं. वेलची पचनास मदत करते.
२. सर्व डाळी भाजून भाजणी करून चकली करतात. तीळ, ओवा आणि लोण्याचं किवा तुपाचं मोहन घातलं जातं. अशी चकली उत्तम प्रोटिनच असते. तसेच, तांदळाच्या पिठाची किवा मुगाची चकली ही उत्तमच.
३. रवा साजूक तुपात भाजून, सुकामेवा घालून केलेला लाडू शक्तिवर्धक असतो.
४. चिवड्यात पोहे, शेंगदाणे, मनुका, कढीपत्ता, खोबरं, कांदा म्हणजे आयर्न, गुड फॅट्स, विटामीन, मिनीरल, ॲंटीऑक्सिडंट्स अशा कितीतरी गोष्टी चिवडा खाताना आपोआप पोटात जातात.
५, अनारसे भरपूर खसखस लाऊन तळले जातात. खसखशीत भरपूर कॅल्शियम असते. जे थंडीत हाडे मजबूत ठेवतातच, पण खसखशीमध्ये वेदना कमी करण्याचा गुणधर्म आहे.
आता सांगा, फराळ अनहेल्दी कसा म्हणायचा?
लक्षात ठेवा...
फराळाचे पदार्थ शक्यतो नाश्त्याला खावे. प्रमाणात खावे. फराळ केल्यानंतर कोमट किवा गरम पाणी प्यावे. त्यामुळे पचन चांगले होते.
घरी मायेनं, निगुनीनं, सगळ्यांनी एकत्र येऊन केलेले पदार्थ एकत्र बसून खाण्यात दिवाळीचा आनंद असतो.
Shitalmogal1912@gmail.com