नाश्त्यासाठीचा पोटभरीचा आणि पौष्टिक पर्याय म्हणजे इडली. गरमागरम सांबारासोबत वाफाळत्या इडल्या म्हणजे चविष्ट पौष्टिक मेजवानी. नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण, छोट्या पार्टीचा मेनू म्हणून इडली सांबार हा पर्याय आवडीनं आणि आवर्जून निवडला जातो. अशी ही इडली उरल्यानंतर काय करावं या प्रश्नाचं टेन्शन येत नाही कारण उरलेल्या इडलीचे इडली फ्राय, इडली चाट असे चविष्ट प्रकार करता येतात. शेफ रणवीर ब्रारने उरलेल्या इडलीला चायनीज तडका देऊन चिली इडली असा मस्त चटपटीत पदार्थ स्नॅक्ससाठी करण्याचा पर्याय सांगितला आहे. अवघ्या 15 मिनिटात चिली इडली तयार होते.
Image: Google
कशी करायची चिली इडली?
चिली इडली तयार करण्यासाठी 2 मोठे चमचे काॅर्न स्टार्च किंवा अरारुट पावडर, 2 मोठे चमचे मैदा, अर्धा चमचा व्हिनेगर, चवीपुरतं मीठ, थोडं पाणी, 5-6 इडल्या ( फ्रिजमधून बाहेर काढून नाॅर्मल टेम्परेचरला आणलेल्या) , तळण्यासाठी तेल, फोडणीसाठी 2 चमचे तेल, 1 इंचं बारीक चिरलेलं आलं, 1 लसणाची पाकळी ठेचलेली, 1 कांदा ( जाडसर चिरलेला) , 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, दीड चमचा सोया साॅस ( पातळ), 2 मोठे चमचे टमाटा केचप, 1 मोठा चमचा चिली साॅस, 1 सिमला मिरची (जाडसर चिरलेली) अर्धा चमचा काॅर्न स्टार्चचं पातळ मिश्रण आणि बारीक चिरलेली कांद्याची पात घ्यावी.
आधी एका मोठ्या भांड्यात काॅर्न स्टार्च, मैदा, व्हिनेगर, मीठ आणि पाणी घालून त्याचं सरसरीत मिश्रण करुन घ्यावं. इडल्या फ्रिजमधून बाहेर काढून सामान्य तापमानाला आल्या की त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. तळण्यासाठी तेल तापवावं. तेल तापलं की काॅर्न स्टार्च आणि मैद्याच्य मिश्रणात इडलीचे तुकडे घोळून तेलात सोडावेत.
Image: Google
मध्यम आचेवर इडलीचे तुकडे अर्धवट तळून बाजूला ठेवावेत. कढईत तेल घ्यावं. त्यात बारीक चिरलेली मिरची, आलं आणि ठेचलेला लसूण घालावा. नंतर त्यात कांदा घालून तो हलकासा परतावा. सोया साॅस घालून ते गॅसची मोठी आच ठेवून जाळावं अर्थात कॅरेमलाइज्ड करावं. नंतर यात टोमॅटो केचप, रेड चिली साॅस घालून ते मिनिटभर हलवून घ्यावं.
साॅस परतले गेल्यावर त्यात सिमला मिरचीचे तुकडे घालून ते परतावे. ते थोडे शिजले जाण्यासाठी त्यात थोडं पाणी घालावं. पाण्याला उकळी येवू द्यावी. त्यात थोडं काॅर्न स्टार्चचं घट्टसर मिश्रण घालावं. साॅसच्या चवीची तीव्रता कमी करण्यासाठी हे मिश्रण घालावं. मिश्रण चांगलं मिसळून घ्यावं.
Image: Google
तेल पुन्हा तापवून त्यात अर्धवट तळलेले इडलीचे तुकडे घालून ते सोनेरी रंगावर कुरकुरीत तळावेत. तळलेले इडलीचे तुकडे साॅसच्या मिश्रणात् घालून चांगले परतून घ्यावेत. गॅस बंद करुन वरुन बारीक चिरलेली कांद्याची पात घालावी.