ढोकळा घरी करायचा म्हटला तर तो जाळीदार होणार की नाही याची काही गॅरण्टीच नसते. कधी होतो तर कधी हमखास बिघडतो. झटपट काहीतरी छान करावं म्हणून ढोकळा करायला जातो, पण ढोकळा बिघडल्याने सर्व नियोजन बिघडतं. ढोकळा छान जाळीदार हलका फुलका होणे हे लकवर नाही तर आपण ढोकळ्यासाठी जे प्रमाण वापरतो त्यावर अवलंबून असतं. व्यवस्थित, प्रमाणबध्द सामग्रीचा ओव्हनमधला कपातला ढोकळा हा हमखास स्पंजी होतोच. ओव्हनमधला कप ढोकळा हा खरोखर घण्टो का काम मिंटो में 'चा मामला आहे. करुन पाहा आणि मनासारखा स्पंजी ढोकळा जमला म्हणून स्वत:वरच खूष व्हा!
Image: Google
कसा करावा स्पंजी कप ढोकळा?
ओव्हनमधला कप ढोकळा करण्यासाठी 1 कप बेसन पीठ, अर्धा कप दही, 2 लहान चमचे इनो, 1 बारीक कापलेली हिरवी मिरची, 1 छोटा चमचा आल्याची पेस्ट, 1 मोठा चमचा साखर, 1 मोठा चमचा तेल, चवीप्रमाणे मीठ, पाव कप पाणी, फोडणीसाठी मोहरी, कढीपत्ता,एवढी सामग्री लागते. स्पंजी कप ढोकळा करताना एका मोट्या भांड्यात बेसन पीठ खावं. त्यात घट्ट दही घालावं. दही ताजं असावं, ते खूप आंबट असू नये. आल्याची पेस्ट करवी. आल्याची पेस्ट, साखर आणि हळद बेसन आणि दह्याच्या मिश्रणात घालावे. सर्व नीट मिसळून घ्यावं. नंतर यात तेल, मीठ आणि पाणी घालावं. हे सर्व नीट मिसळून घेतल्यावर मिश्रणात इनो घालावा आणि तो घातला की मिश्रण वेगानं फेटावं.
Image: Google
मायक्रोव्हेव सेफ कप घ्यावेत. कपांना आतल्या बाजूने तेल लावून कोटिंग करावं. कपामध्ये ढोकळ्याचं मिश्रण घालावं. मिश्रण कपात घालताना ते कपात काठोकाठ घालू नये. हा कप 2-3 मिनिटं ओव्हनमध्ये ठेवावा. एका कढईत थोडं तेल गरम करावं. तेल गरम झालं की त्यात एक लहान चमचा मोहरी घालावी. मोहरी तडतडली की कढीपत्ता घालावा आणि बारीक चिरलेली मिरची घालावी. फोडणीत थोडी साखर आणि पाणी घालावं. गॅस मंद करुन मिश्रणाला उकळी काढावी.
ओव्हनमधून ढोकळ्याचे कप बाहेर काढावेत. या ढोकळ्यंवर चमच्यानं ही फोडणी घालावी. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर, खोवलेलं ओलं खोबरंही घालता येतं. या पध्दतीने कितीही आणि कधीही ढोकळे करा ते खात्रीने स्पंजी होतात.