एकवेळ स्वयंपाक करणं सोपं, पण स्वयंपाकघर आवरणं, ते स्वच्छ ठेवणं हे महाकठिण काम आहे. स्वयंपाक करताना ओटा घाण होणं, स्वयंपाकघरात पसारा होणं साहजिकच आहे. पण हा पसारा कमीत कमी होवून स्वयंपाक झाल्यानंतर पटकन स्वयंपाकघर आवरुन होणं हे मोठं कौशल्याचं काम आहे. काही गोष्टींचं पालन केल्यास हे कौशल्य सहज आत्मसात करता येतं. स्वयंपाक करताना ओट्यावर पसारा होतो, सिंकमधे भांडे साचतात, स्वयंपाकाची भांडी कोरडी झाल्यानं घासण्यास त्रास होणं, ही स्वयंपाकघर आवरण्यातील मोठी आव्हानं आहेत. पण स्वयंपाकघर आवरण्याच्या कौशल्यानं ही आव्हानं सहज पेलता येतात आणि दहा जणांचा स्वयंपाक रांधला तरी स्वयंपाकघर झटक्यात आवरुन चमकवता येतं. ते कसं?
छायाचित्रं- गुगल
स्वयंपाकघर कसं आवराल?
1. स्वयंपाक करतानाच थोडा ऑरगनाइज राहाण्याचा, जिथली वस्तू लगेच तिथे ठेवण्याचा प्रयत्न केल्यास स्वयंपाक करताना कमी पसारा आणि कमी कचरा होतो. भाज्या चिरताना सगळ्यात जास्त कचरा होतो. अशा वेळेस घरात दही, श्रीखंड यांचे पुन्हा वापरआ येण्यासारखे डबे असतात. असे डबे भाजी चिरताना, लसूण वगैरे सोलताना जवळ ठेवावे. त्यात भाज्यांचा कचरा एकत्र करावा आणि कचरा पेटीत टाकावा. यामुळे भाज्यांचा कचरा पटकन आवरुन होतो. कचरा टाकल्यानंतर हे डबे पाण्यानं स्वच्छ धुवावेत आणि इतर भांड्यापासून ते वेगळे ठेवावेत.
2. स्वयंपाक करताना बेसिनमधे एखादं भांडं पडलं की ते घासा असं होत नाही. सगळा स्वयंपाक झाल्यावर किंवा स्वयंपाक आणि जेवणं झाल्यावर भांडी घासण्याचं काम होतं. पण तोपर्यंत सिंकमधली भांडी कोरडी होतात आणि ती घासण्यास खूप त्रास होतो आणि वेळही जातो. त्यामुळे ही भांडी नंतर घासण्यास सोपी जावी याची आधीच काळजी घ्यायला हवी. यासाठी स्वयंपाकाला भिडण्याआधी एका भांड्यात थोडं गरम पाणी करावं. त्यात थोडं लिक्विड डिश वॉश घालावं. या पाण्यात एक स्पंजी घासणी टाकून ठेवावी. आणि स्वयंपाकाची भांडी बेसिनमधे ठेवली की भांड्यातलं पाणी घासणीनं पिळून त्यात टाकावं. यामुळे नंतर भांडी घासताना खराब भांडीही पटकन स्वच्छ होतात.
छायाचित्रं- गुगल
3. स्वयंपाक करताना तो स्मार्टली करता यायला हवा. तरच स्वयंपाकघरात कमी कचरा होतो. पीठ, मैदा,बेसनपीठ मोजून घेताना, किंवा चाळताना ते खाली सांडतं आणि ओटा अस्वच्छ होतो. हे टाळण्यासाठी पीठ वगैरे चाळताना खाली पेपर पसरवून ठेवावा. नंतर हा पेपर गुंडाळून टाकून दिला की ओटा स्वच्छ राहातो.
4. स्वयंपाक झाल्या झाल्या गॅस, ओटा आणि सिंकमधली भांडी आवरुन ठेवली की स्वच्छतेचा काम पटकन होतं. अनेकींना स्वयंपाक झाल्यानंतर गॅस ओटा स्वच्छ करण्याचा कंटाळा येतो, करु नंतर म्हणून पसारा तसाच राहातो. पण स्वयंपाकघरातल्या कचर्यात पाणी, तेला तुपाचे डाग यांचा समावेश असतो. त्यामुळे ओट्यावरचे, गॅसवरचे डाग जर कोरडे झाले तर मग नंतर ते पटकन पुसले जात नाही आणि व्यवस्थित स्वच्छही होत नाही. म्हणूनच वेळच्या वेळी स्वयंपाकघर आवरुन ठेवल्यास स्वयंपाकघर पटकन स्वच्छ होतं.
5. गॅस ओट्याला लावलेल्या टाइल्स भाज्या आमट्यांना फोडणी देताना तेलाचे डाग उडून चिकट होतात. या टाइल्स स्वयंपाक झाल्यानंतर थोड्या साबणाच्या पाण्यानं पुसल्या की लगेच स्वच्छ होतात. पण ते डाग जर तसेच राहू दिले तर टाइल्सवरचा मेणचटपणा वाढत जातो. तो स्वच्छ करायला वेळ तर लागतोच पण त्यामुळे स्वयंपाकघरही खूप अस्वच्छ दिसतं. यामुळे घरात झुरळं, मुंग्याही होतात.