Join us  

डाएटच्या नावाखाली उकडलेलं खाताय खरं, पण उकडून खाण्याचा उपयोग होतोय की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:18 PM

स्वयंपाक प्रक्रियेत पदार्थातील पोषक तत्त्वं राखून ठेवण्यास, पोषक तत्त्वांची गुणवत्ता वाढवण्यात, पदार्थाला विशिष्ट चव देण्यास उकडण्याची क्रिया कारणीभूत ठरते. उकडण्याच्या प्रक्रियेचे अभ्यास आणि संशोधनातून सिध्द झालेले गुणधर्म वाचल्यास आपणही आवर्जून पदार्थ उकडून खाण्याला जास्त महत्त्व द्याल हे नक्की!

ठळक मुद्दे उकडण्याच्या प्रक्रियेत भाज्या किंवा इतर अन्न घटकातील पोषक तत्त्वं राखली जातात. त्याचाच परिणाम म्हणजे उकडलेल्या पदार्थांमधून शरीरात जास्त पोषक तत्त्वं जातात.उकडण्याची क्रिया भाज्या किंवा अन्न घटकातील ८७ टक्के ऑक्सलेटस काढून टाकतात. हे ऑक्सलेटस किडनी स्टोन निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात.उकडण्याच्या क्रियेमुळे अन्न घटकातील अ‍ॅण्टिऑक्सिडण्टचं प्रमाण वाढतं.

स्वयंपाक हा फक्त अन्न घटकांनी सिध्द होत नाही. तर वेगवेगळ्या क्रिया पदार्थांना पूर्णत्त्व देतात. कोणताही पदार्थ म्हटला की त्याच्यात कृतीचा अंतर्भाव  असतो. उकडणे या क्रियेला स्वयंपाकशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेकांना उकडलेले पदार्थ खाणं हे खूप सपक आणि बोअर वाटतात. पण पदार्थाला आपल्या पोटात जाण्यास सुरक्षित करण्यास , स्वयंपाक प्रक्रियेत पदार्थातील पोषक तत्त्वं राखून ठेवण्यास, पोषक तत्त्वांची गुणवत्ता वाढवण्यात, पदार्थाला विशिष्ट चव देण्यास उकडण्याची क्रिया कारणीभूत ठरते. उकडण्याच्या प्रक्रियेचे अभ्यास आणि संशोधनातून सिध्द झालेले गुणधर्म वाचल्यास आपणही आवर्जून पदार्थ उकडून खाण्याला जास्त महत्त्व द्याल हे नक्की!

उकडण्याच्या क्रियेमुळे काय होतं?

  • भाज्या किंवा इतर अन्नघटक उकडण्याच्या प्रक्रियेमुळे सुरक्षित होतात. कारण त्यातले शरीरास हानिकारक असे अतिसूक्ष्म घटक ही क्रिया नष्ट करते. म्ह्णूनच उकडलेले पदार्थ आपण खातो याचा अर्थ आपल्या शरीरात अन्न पदार्थांद्वारे शरीरास घातक अतिसूक्ष्म घटक जाणार नाही ही खात्री होते.
  •  उकडण्याच्या क्रियेमूळे अन्न घटकातील अ‍ॅण्टिऑक्सिडण्टचं प्रमाण वाढतं. आपल्या शरीराचं घातक मूक्त मूलक अर्थात फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण करण्यासाठी हे अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस खूप महत्त्वाची असतात. हे फ्री रॅडिकल्स शरीरात रासायनिक प्रतिक्रियांची साखळी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात त्याचा परिणाम म्हणजे पेशींची वय होण्याची प्रक्रिया ही वेळेआधीच सुरु होते. ते रोखण्यास ही उकडण्याची क्रिया मदत करते.
  •  उकडल्यानंतर भाज्या, पदार्थ हे मऊ होतात. त्याचा परिणाम म्हणजे भाजण्या तळण्याच्या तुलनेत उकडलेले पदार्थ पचण्यास सुलभ होतात. हे पदार्थ पचण्यास कमी वेळ आणि पोटातील कमी आम्लं तयार होतं. त्याचाच परिणाम म्हणजे पोटातील अ‍ॅसिडिटी वाढत नाही.
  • उकडण्याची क्रिया भाज्या किंवा अन्न घटकातील ८७ टक्के ऑक्सलेटस काढून टाकतात. हे ऑक्सलेटस किडनी स्टोन निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. जास्तीत जास्त ऑक्सलेटस निघून गेल्यामुळे भाज्या किंवा अन्न घटकातून कमी ऑक्सलेटस पोटात जातात. त्याचा परिणाम म्हणून किडनी स्टोन रोखण्यास आणि बरा करण्यास होतो.
  •  उकडण्याच्या प्रक्रियेत भाज्या किंवा इतर अन्न घटकातील पोषक तत्त्वं राखली जातात. त्याचाच परिणाम म्हणजे उकडलेल्या पदार्थांमधून शरीरात जास्त पोषक तत्त्वं जातात. हे पोषक तत्त्वं शरीराची क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. शरीर आतून सुदृढ आणि निरोगी करण्यास मदत करतात. आणि जर शरीर आतून सुरक्षित असेल तर मग त्याचे चांगले  परिणाम त्वचेवरही दिसून येतात.

 

  • केसांची वाढ होण्यास उकडलेले पदार्थ चालना देतात. उदा गाजर हे उकडून घेऊन केसांना लावल्यास त्याचा केस वाढीसठी फायदा होतो. केसांच्या मुळांची वाढ करण्यास गाजरातील जीवनसत्त्वांच्या उच्च पातळीमुळे ही तत्त्वं उद्दिपक म्हणून ओळखली जातात. हे गाजर उकडून त कुस्करुन केसांना मसाज करत लावल्यास केसांच्या वाढीला उत्तम खतपाणी मिळतं.
  •  पोटातील हेलिकोबॅक्टर पायलोरी हा जिवाणू पोटात दाह निर्माण करतो. तोच पोटातील अल्सरला कारणीभूत ठरतो. त्याचं कार्य रोखण्याचं काम उकडण्याच्या क्रियेद्वारे होतं. उकडल्यामुळे पदार्थ मऊ होतात. त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्यास ;पोटाच्या अस्तरावर ताण येत नाही.
  •  या पोषक गोष्टींबरोबरच उकडण्याच्या क्रियेमुळे वेळ वाचतो. पदार्थ पटकन होतात. एका बाजूला पदार्थ उकडायला ठेवले की ते होईपर्यंत दुसरं काम होतं.
  • उकडलेल्या अन्न घटकांपासून विवध पाककृती बनवता येतात. साधं बटाट्याचं उदाहरण घेतल्यास सहज लक्षात येतं. बटाटा उकडून सॅण्डविच ते पराठे असे अनेक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करता येतात.

हे शक्यतो उकडूनच खा?

 

  1.  मका हा भाजून खाण्यापेक्षा उकडून खावा. कारण उकडण्याच्या प्रक्रियेत मक्यातील पोषक तत्वं सुरक्षित राहतात. यात ब जीवनसत्त्वं , लोह, मॅग्नेशिअम आणि झिंकसारखी खनिजं असतात. ही पोषक तत्त्वं उकडण्याच्या प्रक्रियेत शाबूत राहून आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात.
  2.  ब्रोकलीमधे क आणि के जीवनसत्त्व असतात. शिवायल लोह आणि पोटॅशिअम ही खनिजं आणि प्रथिनं मोठ्या प्रमाणावर असतात. ब्रोकोली उकडून ती सूपच्या स्वरुपात सेवन केल्यास ब्रोकोलीतील पोषक तत्त्वांचा शरीरास फायदा मिळतो.
  3.  तळलेला बटाटा आरोग्यास हानिकारक असतो तर उकडलेल्या बटाट्यात उष्मांक आणि फॅटस कमी होतात. उकडलेला बटाटा त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबिर टाकून चाट स्वरुपात चटपटीत लागतो.