Join us  

तुम्हीपण कोशिंबीर किंवा सॅलेडमध्ये वरुन जास्तीचे मीठ घेऊन खाता ? सावधान, WHO म्हणते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2023 9:49 PM

Is salt added to a salad before eating? : सॅलेड किंवा कोशिंबीरमध्ये वरुन जास्तीचे पांढरे मीठ टाकून ते खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात.

आपल्यापैकी काही लोकांना जेवताना पदर्थांवरून जास्तीचे मीठ भुरभुरवून खाण्याची सवय असते. इतकेच नव्हे तर पदार्थात मिठाचे प्रमाण अगदी योग्य असले तरीही काही लोक जेवताना आवर्जून ताटात जास्तीचे मीठ वाढून घेतात. काहीवेळा पदार्थात मिठाचे प्रमाण कमी झाले म्हणून जास्तीचे मीठ वाढून घेणे योग्य आहे. परंतु उगाच गरज नसताना अधिक मीठ खाणे आपल्या आरोग्याला हानिकारक ठरु शकते. मीठ हा आपल्या अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या जेवणाची चव वाढवतो. जेवणात एकवेळ मीठ कमी असलेलं चालतं, पण मीठाशिवाय खाण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. योग्य प्रमाणातील मिठाच्या सेवनाने जेवणाची चव वाढते, तसेच शरीर निरोगी राहते.

जेवताना आपण बऱ्याचदा तोंडी लावायला म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर किंवा सॅलड करुन खातो. रोजच्या जेवणात कोशिंबीर किंवा सॅलड खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. परंतु जेवताना वाढून घेतलेली कोशिंबीर किंवा सॅलड यावरुन जर आपण जास्तीचे मीठ किंवा लिंबू पिळून खात असाल तर ते चुकीचे आहे. यामुळे आपल्याला आरोग्यासंबंधित विविध समस्यांना सामोरे जावे लागेल. याचे खरे कारण म्हणजे मिठात सोडियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे जेवणात जास्त मीठ खाल्ल्यास शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. सॅलड किंवा कोशिंबीरमध्ये वरुन जास्तीचे पांढरे मीठ टाकून ते खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात(Is salt added to a salad before eating?).

कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये वरुन जास्तीचे मीठ घेऊन का खाऊ नये ? 

आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जेवणात किंवा कोशिंबीर व सॅलडमध्ये वरून मीठ घातल्यावर जेवण, तसेच इतर पदार्थ कधीही खाऊ नये असा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. कोशिंबीर किंवा सॅलड यावरुन जर आपण जास्तीचे मीठ भुरभुरवून खाल्ल्याने शरीरातील सोडियमची पातळी वाढते. यामुळे आपल्याला उच्च रक्तदाब किंवा इतर शारीरिक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. जास्तीचे मीठ पदार्थांवरुन घातल्यामुळे आपला रक्तदाब वाढू शकतो. एवढेच नाही तर आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता होऊ शकते ज्यामुळे आपली हाडे कमकुवत होऊ शकतात. 

कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये वरुन जास्तीचे मीठ घेऊन खाण्याने नुकसानच होते...  

कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये वरुन जास्तीचे मीठ भुरभुरवून खाल्ल्यास पाचक एंझाईम्स खराब होतात. यामुळे आपल्या पचनक्रियेवरही वाईट परिणाम होतो. यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता देखील होते, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रासही होतो. उच्च रक्तदाब वाढणे, झोप न लागणे, अस्वस्थता, किडनीच्या आरोग्यावर परिणाम, लठ्ठपणा यांसारख्या विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

 

मीठ किती खावे हे आरोग्यासाठी महत्त्वाचे... 

‘डब्ल्यूएचओ’ (WHO) च्या मते, आपण दररोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त होते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. ‘डब्ल्यूएचओ’ (WHO)च्या मते, लोक दररोज ९ ते १२ ग्रॅम मीठ खातात, जे आरोग्यास हानी पोहोचवते. डब्ल्यूएचओ’ (WHO) नुसार, मिठाचा वापर अगदी योग्य प्रमाणात केल्यास जागतिक पातळीवर २.५ मिलियन मृत्यू रोखता येऊ शकतात.  

कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये नेमकं कोणते मीठ वापरावे... 

पांढऱ्या मिठामुळे होणारे नुकसान टाळायचे असल्यास कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये काळे मीठ आणि खडे मीठ(Rock Salt) घालून खावे. या दोन्ही मिठात सोडियमचे प्रमाण  कमी असते. हे मीठ कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये चवीनुसार भुरभुरवून घातल्याने छान लागते. ही दोन्ही मीठ गॅस आणि अ‍ॅसिडिटीसाठी देखील चांगली आहेत.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स