सकाळी नाश्त्याला काय हा प्रश्न करणाऱ्यांपासून खाणाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच पडतो. घाई असेल, तर पोहे खाण्याला कोणाचीच ना नसते. डिशभर चविष्ट पोहे चवीला छान लागतात, पोट भरतं आणि महत्त्वाचं म्हणजे पटकन होतात. पोह्यांचे गोड , तिखट असे विविध प्रकार करता येतात. प्रत्येक प्रकार चविष्ट लागतो. हे प्रकार प्रामुख्याने आपल्या नेहेमीच्या पोह्यांपासून केले जातात. पण मुरमुऱ्यांचे पोहे देखील करता येतात. ते चविष्ट तर लागतातच पण आरोग्यासाठीही खूप उपयुक्त असतात. मुरमुऱ्यांच्या पोह्यांना काही ठिकाणी ‘सुशिला’ देखील म्हणतात. हा पदार्थ आपल्या नेहमीच्या पोह्यांसारखाच झट की पट होणारा आणि करताक्षणी फस्त होणारा आहे.
Image: Google
मुरमुऱ्यांचे पोहे का खावेत?
केवळ चव बदल म्हणून नाही तर मुरमुऱ्यांचे पोहे खाण्याला आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे.
१. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हे मुरमुऱ्यांचे पोहे फायदेशीर ठरतात. या पोह्यांमधील घटक त्रासदायक सूक्ष्म जिवाणुंशी लढतात आणि वेगवेगळ्या संसर्गापासून आरोग्याचं रक्षण करतात. याचं कारण मूळ मुरमुऱ्यांमधे असलेली पौष्टिकता. मुरमुऱ्यांमधे अॅण्टिऑक्सिडण्टस, खनिजं आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे घटक रोगप्रतिकाराशक्ती वाढवण्यास उपयुक्त असतात.
२. वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरु असेल तर मुरमुऱ्यांचे पोहे या प्रयत्नात चांगली साथ देऊन वजन कमी करण्यास मदत करतात. कारण मुरमुऱ्यांच्या पोह्यात आपल्या नेहमीच्या पोह्यांपेक्षा कमी कॅलरीज असतात. तसेच तंतूंमय घटक जास्त असतात. त्यामुळे हे पोहे खाऊन पोट भरतं आणि अतिप्रमाणात खाल्लं जाणंही टळतं.
३. मुरमुऱ्यांमधे सोडियमचं प्रमाण कमी असल्याने मुरमुरे आणि त्यापासून बनलेले पोहे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
४. मुरमुऱ्यांच्या पोह्यातून कॅल्शिअम, लोह, ड जीवनसत्त्वं, थियामिन, रायबोफ्लेविन आणि फायबर हे घटक मिळतात. हे घटक हाडतील पेशींची वाढ करण्यास, नवीन पेशी निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरतात.
५. मुरमुऱ्यांच्या पोह्यात पचनास मदत करणारे घटक असतात. त्यामूळे हे पोहे खाल्ले की पचनाला मदत करणाऱ्या विकरांना चालना मिळतात, पोटात अन्नातील घटकांचं विघटन होतं आणि पचनाला मदत करणारे पाचक रस स्त्रवायला मुरमुऱ्यातील घटक मदत करतात.
Image: Google
मुरमुऱ्यांचे पोहे कसे करणार?
मुरमुऱ्यांच्या पोह्यातील ही पौष्टिकता बघून ते करण्याची इच्छा साहजिकच होणार. हे पोहे तयार करण्यास अत्यंत सोपे आहेत. ते करण्यासाठी १ कप साधे किंवा भडंग मुरमुरे , १ मोठा चमचा तेल, एक चिमूटभर हिंग, मोहरी, बारीक कापलेला अर्धा कांदा, ८-१० कढीपत्त्याची पानं, २-३ अख्ख्या लाल मिरच्या ( सुक्या), अर्ध कप बारीक चिरलेला बटाटा, , अर्धा चमचा हळद, चवीपूरतं मीठ, १ चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ मोठा चमचा लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर एवढं जिन्नस घ्यावं.
सर्वात आधी मुरमुरे निवडून घ्यावेत. ते धुवून घ्यावेत. ते पाण्यात भिजत ठेवू नये. धुतलेल्या मुरमुऱ्यांतील पाणी पूर्ण निथळू द्यावं. तेल गरम करावं. ते तापलं की त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता घालावा. ते परतून मग त्यात कांदा घालून तो परतावा. तो परतत असतानाच अख्ख्या लाल मिरच्या घालाव्यात. जेव्हा कांदा सोनेरी रंगावर परतला गेला की त्यात बारीक चिरलेला बटाटा घालावा. बटाटा चमकदार होईपर्यंत परतावा. नंतर त्यात हळद घालावी. बटाटा शिजेपर्यंत गॅसची आच मंद ठेवावी. नंतर गॅसची आच वाढवून फोडणीत मीठ घालावं, ते चांगलं हलवून घेतलं की लगेच भिजवलेले मुरमुरे घालावेत. मुरमुरे फोडणीत चांगल परतून घ्यावेत. नंतर गॅस बंद करुन त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी. लिंबाचा रस घालावा. आवडत असल्यास चवीपुरती साखर घालावी. सर्वात शेवटी कोथिंबीर पेरुन चविष्ट मुरमुऱ्यांच्या पोह्यांचा आस्वाद घ्यावा.