कितीही मापात स्वयंपाक केला तरी काही ना काही शिळं उरतंच. अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणत असताना उरलेले अन्न आपण टाकून न देता त्याचे काही ना काही वेगळे पदार्थ करुन ते खातोच. एखाद दिवशी घरातले कोणी कमी जेवले किंवा अचानक बाहेरुन जेऊन आले तर त्यांच्या वाटचे उरतेच. सध्या आपण सर्रास फ्रिज वापरत असल्याने फ्रिजमध्ये ठेवून हे उरलेले अन्न खाता येते. साधारणपणे रात्री आपल्याकडे वरण-भाताचा कुकर आवर्जून लावला जातो. अनेकदा हा भात उरतो आणि मग तोच दुसऱ्या दिवशी सकाळी फोडणीला देऊन खाल्ला जातो. फोडणीच्या भाताला कांदा, कडिपत्ता, मिरची, दाणे असे सगळे घातले की छान चवही येते. असे असले तरी सारखा फओडणीचा भात खायला नको होत असेल तर उरलेल्या भातापासून करता येतील असे काही वेगळे पदार्थ पाहूयात. थोड्या चलाखीने हे पदार्थ केले तर ते शिळ्या भाताचे आहेत हे कळणार तर नाहीच पण ते खायलाही छान लागतील.
१. थालिपीठ
भात हाताने बारीक करुन थालिपीठामध्ये आपण ज्याप्रमाणे कांदा घालतो त्याचप्रमाणे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालावी. मीठ, तिखट, धने-जीरे पावडर आणि थोडेसे डाळीचे पीठ घालून पीठाप्रमाणे हे छान मळून घ्यायचे. त्याचे छोटे गोळे करुन तव्यावर तेल घालून थालिपीठ लावायचे. हे गरमागरम थालिपीठ दही, लोणचे, स़ॉस अशा कशाबरोबरही अतिशय छान लागतात. विशेष म्हणजे हे भाताचे आहे असे कळतही नाही.
२. भजी
भाताची भजी करण्यासाठी उरलेला भात आधी चांगला हातानं कुस्करुन घ्यावा. त्यात १ कप बेसन, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं आलं, लाल तिखट, हळद, २ हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, धने पावडर, ओवा, जिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ हे सगळे घालून एकजीव करुन घ्यावे. हे मिश्रण दहा मिनिटं झाकून ठेवावं. नंतर त्यात पाणी घालून भज्यांच्या पिठासारखं मिश्रण करावं. कढईत तेल तापायला ठेवून चमच्यानं मिश्रण तेलात सोडून भजी मध्यम आचेवर तळून घ्यावीत. तळलेल्या भजीतलं जास्तीचं तेल निघून जाण्यासाठी ती टिश्यू पेपरवर घालावीत. ही कुरकुरीत भजी पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत छान लागतात.
३. डोसे
भात मिक्सरमधून पाणी घालून बारीक करुन घ्यायचा. त्यामध्ये अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घालायचे. भात मिक्सर करतानाच त्यामध्ये मिरची आणि लसूण वाटून घ्यायचे. यामध्ये मीठ, जीरे, साखर आणि चिमूटभर सोडा घालायचा. हे पीठ अर्धा तास तसेच झाकून ठेवायचे. नंतर याचे तव्यावर तेल सोडून डोसे घालायचे. हे गरमागरम डोसे अतिशय छान लागतात. विशेष म्हणजे ते शिळ्या भातापासून केले आहेत हे अजिबात कळत नाही.