जेवणात भाजी, आमटी किंवा अगदी कढी खाताना कढीपत्ता आला तर आपण मिरची बाजूला काढतो त्याप्रमाणे कढीपत्ता बाजूला काढतो. फोडणीत कढीपत्ता घातल्याने आणि पदार्थ शिजताना तो त्यातच असल्याने त्याचा अर्क पदार्थात उतरलेला असतो. असे असले तरी पदार्थातील कढीपत्ता बाजूला न काढता तो चावून खायला हवा. कढीपत्ता आरोग्याच्या विविध तक्रारींवर अतिशय उपयुक्त असून सौंदर्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो. पदार्थाला स्वाद आणि चव आणण्याबरोबरच कढीपत्त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. आपल्या घरातील अनेक घटक आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी उपयुक्त असतात. पण त्यांचा उपयोग न करता आपण फॅन्सी गोष्टींकडे आकर्षित होतो. मात्र या पारंपरिक गोष्टींचा आहारात आणि सौंदर्यप्रसाधने म्हणून योग्य पद्धतीने वापर केल्यास आपल्या बऱ्याच तक्रारी दूर होण्यास मदत होते. पाहूयात कढीपत्त्याचा पदार्थांमध्ये उपयोग केल्याने आणि तो बाजूला न काढता चावून खाल्ल्याने आरोग्याला मिळणारे फायदे सांगत आहेत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदिप काळे
१. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कढीपत्त्याचा आवर्जून समावेश करायला हवा. त्यामुळे वाढलेल्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळण्यास मदत होते.
२. केसांच्या सौंदर्यासाठीही कढीपत्ता अतिशय उपयुक्त असतो. कढीपत्त्याची पेस्ट तयार करुन त्यात दही घालून ही केसांना लावावी. अर्धा तासानंतर केस शाम्पूने धुवावेत. असे नियमित केल्यास केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.
३. कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असल्याने कढीपत्ता खाल्ल्यास चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स, येणे बंद होते. कढीपत्ता खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
४. कढीपत्ता रक्तशुद्धीकरणाचे काम करत असल्याने चेहऱ्याचा पोत सुधारतो तसेच आरोग्याच्या इतर तक्रारींपासूनही सुटका होते.
५. कॅन्सर होऊ नये म्हणून उपयुक्त असणारे बहुगुणी गुणधर्म कढीपत्त्यामध्ये असतात. तसेच जीवाणूविरोधी आणि वेदनाशामक घटकही कढीपत्त्यामध्ये असल्याने कढीपत्ता बाजूला न काढता तो चावून खायला हवा.
६. पचक्रियेच्या तक्रारींमुळे अनेक जण हैराण असतात. त्यामुळे पचनक्रियेत सुधारणा होणे आवश्यक वाटत असेल तर पदार्थांमधील कढीपत्ता खायला हवा. त्यामुळे पचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.
७. कढीपत्त्याची पूड मुलतानी माती किंवा लिंबू किंवा मध यांच्यामध्ये एकत्र करुन लावल्यास चेहरा उजळण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे घरगुती फेसपॅक करुन तुम्ही चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकता.
८. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. नजर जास्तीत जास्त चांगली हवी असेल तर कढीपत्ता खाणे फायद्याचे ठरते.
९. सर्दी, कफ यांसारख्या तक्रारींवरही कढीपत्ता अतिशय फायदेशीर ठरतो. अशावेळी पदार्थांमध्ये कढीपत्ता घालण्याबरोबरच कढीपत्त्याची चटणी केल्यास त्यातून जास्त प्रमाणात कढीपत्ता पोटात जाऊ शकतो.
१०. कढीपत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक अॅसिड बऱ्याच प्रमाणात असल्याने महिलांशी निगडीत तक्रारींवर कढीपत्ता गुणकारी आहे.
११. उलटी- मळमळ अशा तक्रारी असतील तर कढीपत्त्याचा काढा किंवा चहा करुन प्यावा. १५ ते २० पाने स्वच्छ धुवून २ कप पाण्यात उकळावीत. त्यानंतर पाने पाण्यात तशीच राहू द्यावीत. म्हणजे त्याचा अर्क उतरण्यास मदत होते. चवीसाठी यामध्ये थोडी साखर किंवा मध घालू शकता.
१२. लहान मुलांना अनेकदा जंताचा त्रास होतो. त्यावरील रामबाण उपाय म्हणून कढीपत्ता उपयुक्त ठरतो. मुलांना कढीपत्ता खायला दिल्यास लहान आतड्यांतील जंत मरण्यास मदत होते. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आहारात कढीपत्त्याचा समावेश करायला हवा.