Lokmat Sakhi >Food > दोदोल-दोस-बेंबिका-गोड सांना गोव्यातले हे ख्रिसमस स्पेशल पदार्थ खाऊन पाहिलेत का?

दोदोल-दोस-बेंबिका-गोड सांना गोव्यातले हे ख्रिसमस स्पेशल पदार्थ खाऊन पाहिलेत का?

गोव्यातला ख्रिसमस वेगळाच असतो, पण इथल्या घराघरांत होणारे सुंदर पदार्थ, त्यांचा दरवळ, ती चव हे सारं गोवन ख्रिसमस अगदीच स्पेशल करतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 04:43 PM2021-12-24T16:43:53+5:302021-12-24T16:54:22+5:30

गोव्यातला ख्रिसमस वेगळाच असतो, पण इथल्या घराघरांत होणारे सुंदर पदार्थ, त्यांचा दरवळ, ती चव हे सारं गोवन ख्रिसमस अगदीच स्पेशल करतात.

Dodol-Dos-Bembika-God Sana Christmas special dishes from Goa? | दोदोल-दोस-बेंबिका-गोड सांना गोव्यातले हे ख्रिसमस स्पेशल पदार्थ खाऊन पाहिलेत का?

दोदोल-दोस-बेंबिका-गोड सांना गोव्यातले हे ख्रिसमस स्पेशल पदार्थ खाऊन पाहिलेत का?

Highlights बेक केलेल्या कुकीज, केक यांचा सुगंध घराघरात दरवळत असतो.

मनस्विनी प्रभुणे -नायक

डिसेंबर महिना गोव्यासाठी विशेष असतो. अख्खा डिसेंबर महिना गोव्यात जगावा असा असतो. एरवी उष्ण आणि दमट असणारी हवा देखील याकाळात बदलते. सकाळी-संध्याकाळी छानसा गारवा जाणवू लागतो. गोव्यात याकाळातला उत्साह बघून जणू काही हा महिना गोव्यासाठीच तयार झाला असावा असं वाटू लागतं. वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाचं स्वागत करायला अनेकजण मुद्दाम गोव्यात येतात. गोव्यातले समुद्र किनारे गजबजू लागतात. तसा वर्षभरातील प्रत्येक महिना आपली छाप पडून जात असतो. काही महिन्यांना आपणच ओळख मिळवून देतो तसा हा डिसेंबर महिना आहे. गोव्याबद्दल अनेकपरीने उत्सुकता व्यक्त होत असते. त्यात गोव्यातल्या 'ख्रिस्ती' समाजाबद्दल आणि यातील महिलांबाबत असलेली उत्सुकता कधी लपून राहत नाही. गोव्यातील कॅथलिक समाज हा गोव्याची ओळख बनलाय. पोर्तुगीजांनी या समाजाला इथल्या मातीपासून, इथल्या संस्कृतीपासून तोडण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला पण तसं घडू शकलं नाही. या मातीशी जोडून ठेवण्यात कॅथलिक महिलांचा मोठा आहे. मारिया कुतो अवरोरा यांसारख्या अनेक लेखिकांनी आपल्या लेखनातून गोव्यातील कॅथलिक महिलांचं जीवन अतिशय सुंदरपणे रंगवलंय.

वय झालेल्या पिढीतल्या अनेकजणी आजही छानशा फ्रॉकमध्ये दिसतात. अनेक वर्ष हा फ्रॉकच त्यांची ओळख बनला होता. गोव्यातल्या समाजातील अनेकांचं धर्मांतरण झाल्यानंतर त्यांचा नुसताच धर्म बदलला नाहीतर त्यांची वेशभूषा, राहणीमान जाणीवपूर्वक बदललं गेलं. त्यात या फ्रॉकमुळे कॅथलिक आणि हिंदू महिलेमधील फरक लक्षात येऊ लागला. सुंदरशा फुलाफुलांचे फ्रॉक घातलेली कॅथलिक महिला आपल्याला अनेक हिंदी चित्रपटामधूनही बघितली आहे. पण आताची पिढी स्कर्ट, मिडी, छानसे वनपीस, जीन्स वापरणारी आहे. एवढेच काय तर अगदी हौसेनं साडी देखील नेसते. अतिशय टापटिपीत राहणाऱ्या कॅथलिक महिला वरवर बघता अनेकांना त्या अबोल, रागीट वाटतात. पण तशा त्या अजिबातच नाहीयेत. एकदा का तुमची त्यांच्याशी मैत्री होऊ दे मग बघा छान अखंड गप्पा सुरु होतात.
हा महिना खऱ्या अर्थाने यांचाच महिना. पूर्ण महिना कॅथलिक महिला खूप सुंदररित्या साजरा करतात. या दिवसात मुद्दाम त्यांच्या घरात डोकवावं असंच वातावरण असतं. नुसत्या त्यांच्या घराजवळून जाताना घरातून येणाऱ्या वेगवेगळ्या सुवासांनी जीभेला पाणी सुटू लागतं. बटर, साखर, मैदा, रवा, क्रीम, खोबरं या साऱ्यांपासून बनणाऱ्या वेगवेगळ्या 'बेक' केलेल्या पदार्थांचा घमघमाट या काळात त्यांच्या घराभोवती रेंगाळत असतो. दिवाळीच्या आधी महिनाभर आपली जशी फराळाचे पदार्थ बनवण्याची धावपळ सुरु असते तशीच काहीशी ख्रिसमसच्या आधी कॅथलिक महिलांची धावपळ सुरु असते.
गोमंतकीयच काय पण गोव्याबाहेरील अनेकजण मुद्दाम याकाळात ख्रिसमस साजरा करण्यासाठी गोव्यात येतात. ख्रिसमस साजरा करावा तो गोव्यातच. २४ डिसेंबला मध्यरात्री चर्चमध्ये येशू जन्माची होणारी प्रार्थना, गायली जाणारी वेगवेगळी 'कॅरोल' याने ख्रिसमसच्या वातावरणात सुंदर भर पडते. पण यासगळ्याची तयारी मात्र खूप आधी सुरु झालेली असते. डिसेंबर महिना सुरु होताच घरांना रंग देणं, विविध आकर्षक शोभिवंत गोष्टींनी घराला सजवणं, अंगणात गोठ्यातील येशूचा जन्माचा देखावा तयार करणं, खिडक्या-दारांवर नक्षत्र (चांदणी) लावणं अशा गोष्टींनी घराघरात ख्रिसमसच्या तयारीची लगबग सुरु होते. त्याकाळातील महिलांची लगबग अवर्णनीय असते. बेक केलेल्या कुकीज, केक यांचा सुगंध घराघरात दरवळत असतो. याशिवायही घराघरात काही पारंपरिक पदार्थ बनवले जातात. आधी अनेक चविष्ट पदार्थ बनवण्यात आणि नंतर त्या अतिशय आदरातिथ्याने सर्वांनां खाऊ घालण्यात त्या मग्न असतात

ख्रिसमस स्पेशल गोवन पदार्थ

पोर्तुगीजांनी गोव्यात येऊन इथल्या खाद्यसंस्कृतीवर आपल्या खाद्यसंस्कृतीतील काही पदार्थांची छाप पाडली. बेक करणं ही तर त्यांनीच दिलेली देण. भारतातील पहिली बेकरी गोव्यात सुरु झाली. पाव, पेस्ट्री, केक या गोष्टी प्रामुख्याने या बेकरीमध्ये होऊ लागल्या. आता घराघरात हे सर्व पदार्थ बनवले जातात. गोव्यातील काही पारंपरिक गोष्टींचाही प्रभाव बेक केलेल्या पदार्थांवर पडला. गोव्यात घराघरात उत्तोमोत्तम कुकीज बनवल्या जातात.
इथल्या कॅथलिक घरांमध्ये ख्रिसमसच्या काळात बनवले जाणारे पदार्थ बघून आपल्याला दिवाळीची आठवण जरी आली तरी यातल्या अनेक पदार्थांची नावं गोव्याबाहेर अनेकांना माहीत देखील नाही. कलकल, दोदल, बेबिंका, दोस, सांना, नेवऱ्या (करंज्या) अशा काही आगळ्यावेगळ्या पदार्थांची नुसती नावाचं वेगळी नाहीत तर ते पदार्थ देखील वेगळे आहेत. साधारण ख्रिसमसच्या आधी महिनाभर घराघरात हे पदार्थ बनवण्यासाठी लगबग सुरु होते. घरातल्या सगळ्या बायका एकत्र येऊन हे पदार्थ बनवतात.
'कलकल' पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी कुकीज खास ख्रिसमससाठी बनवली जाते. 'दोदोल', 'बेबिंका', 'दोस' आणि 'सांना' हे देखील पारंपरिक पदार्थ खास ख्रिसमससाठी बनवले जातात. आता यातले काही पदार्थ दुकानातही मिळू लागले आहेत पण तरीही ख्रिसमसच्या आधी घरातील सर्व महिलांनी एकत्र येऊन हे पदार्थ बनवण्यात जी मजा आहे ती दुकानातून विकत आणून ते पदार्थ खाण्यात मजा नाही.

(Image : Google)

दोदोल
नाचणीच्या पिठापासून बनणाऱ्या हा पदार्थ अतिशय पौष्टिक असतो. दुलदुलीत अशा मऊसर वड्यांना दोदोल असं म्हणलं जातं. दोदोल हा पदार्थ मऊसूत असतो. इतर वाड्यांप्रमाणे या वाड्या कडक नसतात. याची चव मुळात माडाच्या गुळावर अवलंबून असते आणि त्यात खोबऱ्याचं तेल वापरल्यास आणखी वेगळीच चव याला येते. दोदोल हा संपूर्ण शाकाहारी पदार्थ आहे.

(Image :Google)

बेबिंका
बेबिंका हा एक पुडींग - पेस्ट्रीचाच प्रकार आहे. हा पदार्थ इंडो-पोर्तुगीज प्रकारात मोडतो. पोर्तुगाल आणि मोझाम्बिक देशातही बेबिंका बनवला जातो. वरवर साधा वाटणारे हे पुडींग बनवताना बराच वेळ जातो पण त्याबरोबर भरपूर पेशन्स ठेवावे लागतात. पण शेवटी हातात येणारा हा पदार्थ सगळे श्रम विसरायला लावतो. मूळ बेबींका हा १६ थरांचा बनवला जायचा. आता किमान ७ थर असलेला बेबिंका बनवला जातो. काहीजणी या ७ थरांच्या बेबिंकातील प्रत्येक थराला वेगळा रंग देतात. जणू इंद्रधनुष्यच. हा देखील एक पारंपरिक गोवन मिष्टान्नाचा प्रकार आहे.

कलकल
कलकल हा कुकीजचाच एक प्रकार आहे. नाव तर वेगळं आहेच पण ही कुकीज बनवणं म्हणजे एक कल्पक काम आहे. विशेषतः ही बनवणं लहान मुलांना अधिक आवडतं. लहान मुलं जर गोंधळ करत असतील तर ' अरे किती कलकल करताय' असं म्हणलं जातं. पण इथे जर मुलं कलकल बनवायला मदत करणार असतील तर ती एकदम चिडीचूप्प होतील. कारण हि बनवताना खूप संयम लागतो. याची चव तर लाजवाब त्याहून जास्त त्याचा आकार आपल्याला आकर्षित करतो. अतिशय कमी वेळात या कुकीज बनतात.

(Image : Google)

दोस
दोस म्हणजे चण्याच्या डाळीच्या वड्या. छान मऊसर लुसलुशीत दोस खूप दिवस टिकतात.

(Image : Google)

गोड सांना
सांना हा प्रकार दोन प्रकारे करतात. एकात साखर किंवा गूळ घातला जातो तर दुसऱ्यात यापैकी काही घालत नाहीत. इडली जशी असते तसाच हा प्रकार. पण करण्याची पद्धत जरा वेगळी. गोवा, कारवार, कर्नाटक तसेच केरळमध्ये अशाच प्रकारचे सांना बनवतात फक्त त्यांचं तिथलं नाव वेगळं आहे. गोव्यात विशेषतः कॅथलिक घरांमध्ये सांना बनवताना त्याचे पीठ आंबवण्यासाठी त्यात थोडी माडाची ताडी घातली जाते. या ताडीमुळे सांनाला एक वेगळीच चव येते. सांना इडलीचेच चुलत-मावस भावंडं शोभतील असे असतात.
गोव्यातील ख्रिसमस हा अशा आगळ्यावेगळ्या पदार्थांशिवाय साजरा होऊ शकत नाही. इथल्या कॅथलिक घरांमध्ये याकाळात हेच पारंपरिक पदार्थ खायला मिळतात. 

(पूर्व प्रसिध्दी : लोकमत सखी २०१८)

Web Title: Dodol-Dos-Bembika-God Sana Christmas special dishes from Goa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.