दिवसाची सुरुवात आरोग्यदायी, पौष्टिक नाश्त्यानं करावी असं आहारशास्त्र सांगतं. पण सकाळच्या कामं आवरण्याच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठीचे पौष्टिक पदार्थ करायला वेळ कुणाला असतो. पण कितीही घाईगडबड असली तरी चाटचे काही प्रकार नक्कीच करता येतील. हे वाचून सकाळच्या वेळी कोणी चाट खातं का असा प्रश्न पडल्याशिवाय राहाणर नाही. चाट हा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खाण्याचा प्रकार असला तरी सकाळच्या नाश्त्याला चाटचे पौष्टिक प्रकार करता येतात. फळं, भाज्या, मोड आलेली कडधान्यं यांचा वापर करुन चाटचे प्रकार करता येतात.
Image: Google
फ्रूट चाट
फ्रूट चाट करण्यासाठी 2 चमचे ऑलिव्ह तेल,अर्धा कप ब्लासमिक व्हिनेगर, 3 चमचे डाळिंबाच्या दाण्याची पावडर, 3 छोटे भाजलेल्या जिऱ्यांची पूड, 2 चमचे चाट मसाला, 2 छोटे चमचे काश्मिरी तिखट, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा सैंधव मीठ, 1 छोटा चमचा मिरे पूड, 2 रताळी, 1 स्टार फ्रूट, अननसाचे काप , लाल पिवळ्या, हिरव्या सिमला मिरचीचा एकेक तुकडा, अर्ध हिरवं सफरचंद, अर्धा पेरु घ्यावा. फ्रूट चाट करताना एका भांड्यात ऑलिव्ह ऑइल आणि बालसॅमिक व्हिनेगर घ्यावं. ते मिसळून त्यात पिठी साखर, डाळिंबाची पावडर, चाट मसाला, गरम मसाला, भाजलेल्या जिऱ्यांची पूड, काश्मिरी तिखट, सैंधव मीठ आणि मिरपूड घालावी. सर्व मसाले नीट मिसळून घ्यावे. या मसाल्यांमध्ये उकडून घेतलेल्या रताळ्याचे काप, हिरवे सफरचंद, स्टारफ्रूट, अननस, सिमला मिरची , पेरु यांचे तुकडे घालावेत आणि अर्धा तास मॅरिनेट करावेत. नंतर स्कूअरमध्ये या फोडी खोचून ओव्हनमध्ये ठेवून बेक करुन घ्याव्यात. हे रोस्टेड फ्रूट चाट चवीला छान लागतं आणि तब्येतीला पौष्टिक असतं.
Image: Google
कैरी चना चाट
उन्हाळ्यात कैऱ्या मनसोक्त खाव्यात. चव आणि आरोग्य दोन्हींसाठी कैरी उपयुक्तच. कैरी चना चाट करण्यासाठी 1 कप काळे हरभरे भिजवून मोड आणलेले, अर्धी कैरी, अर्धं गाजर किसलेलं, अर्धा कांदा चिरुन, चिरलेली काकडी, अर्धा चिरलेला टमाटा, 1 चमचा चाट मसाला, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी.
कैरी चना चाट करण्यासाठी हरभरे आधी भिजवून, एक दिवस बांधून ठेवून मोड आणावेत. मोड आलेले हरभरे शिजवून घ्यावेत. त्यातलं सर्व पाणी नीट निथळून घ्यावं. सर्व भाज्या चिरुन घ्याव्यात. शिजवलेल्या हरभऱ्यांमध्ये आधी चिरलेलं सर्व साहित्य घालावं. नंतर त्यात सर्व मसाले घालून हे नीट मिसळून घ्यावं. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. यात थोडा किसलेला कोबी, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालाव्यात. हा चाट पुदिन्याच्या चटणीसोबत छान लागतो.
Image: Google
स्प्राउट काॅर्न चाट
स्प्राउट काॅर्न चाट करण्यासाठी आपली आवडीची मोड आलेली कडधान्यं घ्यावीत. कडधान्यं आणि मक्याचे दाणे उकडून घ्यावेत. कांदा, टमाटा, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावे. उकडलेल्या कडधान्यात कांदा, टमाटा आणि कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावं. यावर थोडं लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून सर्व नीट मिसळून घ्यावं. नाश्त्यासाठी मोड आलेल्या कडधान्याचं चाट झटपट होतं आणि छान् लागतं.