Join us  

दही खाल्ल्याने वजन वाढते का? दही नक्की कुणी खावे, कुणी खाणे ठरते घातक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2022 2:13 PM

Curd Health Benefits दही चाटपासून पंचामृतापर्यंत अनेक प्रकारे खाल्ले जाते, दह्याचे अनेक गुणधर्म लाभदायक आहे. मात्र,अधिक सेवनही चांगले नाही 

दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दह्यात असलेले गुड बॅक्टेरीया शरीरातील इतर घटकांसाठी मदतगार ठरले आहेत. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅससारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. यातील रासायनिक तत्वांमुळे दुधाच्या तुलनेत दही पचायला हलके असते. मात्र, हिवाळ्यात दही खाण्यास अनेक लोकं टाळाटाळ करतात. दही हे थंड पदार्थ आहे अशी समज लोकांमध्ये निर्माण झाली आहे. परंतु, आयुर्वेदानुसार दही हा गरम पदार्थ आहे. दहीचे अतिसेवन केले कि वजन वाढते असे देखील काही लोकं म्हणतात, पण असे नसून दही शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. भारतीय स्वयंपाकघरात याचा विविध प्रकारे वापर केला जातो. दही चाटपासून पंचामृतापर्यंत अनेक प्रकारे खाल्ले जाते. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी तिच्या इंस्टाग्राम पेजवर दही संबंधित माहिती दिली आहे. चला तर दह्यासंबंधित अनेक गोष्टींची माहिती घेऊयात.

दही थंड नसून असते गरम

अनेक लोकं उन्हाळ्यात दह्याचे अधिक सेवन करतात, आणि हिवाळ्यात दही खाण्यास टाळाटाळ करतात. दहीचे अतिसेवन केल्याने वजन वाढू शकते. दही चवीला आंबट लागते. त्यामुळे अनेक जण साखरेसह त्याचे सेवन करतात. याचे रोज सेवन करणे डाइजेस्टिव सिस्टमसाठी चांगले नाही. दही पचायला सोपे नसल्यामुळे ते रोज खाणे पचनसंस्थेसाठी चांगले नसते.

या लोकांनी टाळावे दही

ज्या लोकांना अॅसिडिटी, मधुमेह, लठ्ठपणा, अपचन, मायग्रेन, अल्सर, हार्मोनल अशा विविध प्रकारचे आजार असल्यास दहीचे सेवन कमी करावे. दह्याऐवजी मठ्ठा किंवा ताक प्यावे. जे वजन कमी करण्यास देखील मदत करेल.

रोज दही खाऊ नका

रोज दही खाऊ नये. त्याऐवजी आपण रोज मठ्ठा किंवा ताक पिऊ शकता. ताकात काळी मिरी आणि जिरेपूड घालून पिऊ शकता. मात्र, दह्यात फळे मिसळू नका. यामुळे ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.

टॉक्सिक कॉम्बिनेशंस टाळा

मासे, चिकन किंवा मटण मिसळून दही खाऊ नका. यामुळे शरीरात टॉक्सिन्स तयार होतात. जे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात.

रात्री दही खाऊ नये

रात्री दही खाऊ नये. दुपारी दही कमी प्रमाणात खाण्यास हरकत नाही. ज्यांना दह्याची समस्या आहे त्यांच्यासाठी ताक उत्तम आहे.

टॅग्स :अन्नआरोग्य