बुरशी ही आपल्या ओळखीची आणि माहितीचीही. पण तिचं त्रासदायक स्वरुप हे कोविड नंतर उद्भवणाऱ्या म्यूकरमायक्रोसिसच्य्या निमित्तानं दिसलं. तेव्हापासून सर्वसामान्य लोकांनीही बुरशीचा धसका घेतला आहे. हळद, आलं, मिरे, आवळा,तुळस, गिलोय,कडूलिंबाची पानं, अश्वगंधा, जिरे लसूण , लवंग या घटकात बुरशीजन्य आजारांना दूर ठेवण्याची, त्यांना प्रतिरोध करण्याची ताकद आहे . हे घटक अधूनमधून आपण वापरतोच पण आता कोरोना संसर्गाच्या काळात या घटकांचं सेवन जाणीवपूर्वक केल्यास त्याचा शरीरास फायदा होतो. तसेच आता पावसाळाही सुरु झाला आहे .पावसाळ्यातल्या बुरशीजन्य आजारांनाही रोखून ठेवण्यास हे घटक मदत करतात. आणि जे कोरोनातून बरे झाले आहे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही ते मदत करतात.
बुरशीला रोखणाऱ्या या अकरा घटकात आहे काय?
- हळद- हळदीचा वापर आपण स्वयंपाकात तर करतोच. पण बुरशीजन्य आजारांना रोखण्यासाठी दुधात हळद घालून पिणं हा उत्तम मार्ग असल्यांचं तज्ज्ञ सांगतात. हळदीत अॅण्टिऑक्सिडण्टस, जीवाणू आणि बुरशी विरोधी घटक असतात. या घटकांंमुळे शरीराची रोगांशी लढण्याची ताकद वाढते. शिवाय हळदीत प्रथिनं, तंतूमय घटक, क जीवनसत्त्वं, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम आणि झिंक सारखे पोषक घटक असतात हे सर्व घटक संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करतात. तसेच हळद शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते.शरीरातील रक्त वाढवण्यासही हळद उपयुक्त असते.
- आलं-सूंठ- चहा आणि काढ्यासोबतच आलं घालून दूध उकळून ते पिल्यास आणि भाज्या करताना आल्याचा वापर केल्यास बुरशीजन्य आजारांना रोखण्यास त्याचा फायदा होतो.
3. मिरे- सर्दी खोकल्यात गुणकारी असलेले मिरे बुरशीजन्य आजरांवरही प्रभावी काम करतात. मिरे घातलेला चहा किंवा सरबत पिणं, भाज्यांमधे मिऱ्यांचा वापर वाढवून मिरे आपण सेवन करु शकतो.
4. आवळा- क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असलेल्या आवळ्यानं शरीरात तंतूमय घटकही भरपूर जातात. त्याचा उपयोग पचन सुधारण्यास, रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यास होतो. आवळा हा नैसर्गिक रेचकाचं काम करतो, त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
5. तुळस- आजारातून बरं होण्यास तुळस मदत करते. तुळशीच्या पानात क जीवनसात्त्वं, राइबोफ्लेविन, नियासिन, कॅल्शिअम, झिंक आणि लोह हे मुख्य घटक असतात. झिंक आणि जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तुळशीची पानं खाणं, ती पानं उकळून ते पाणी पिणं, तुळशीचा रस यास्वरुपात तुळशीचं सेवन फायदेशीर ठरतं.
6. गुळवेल- गुळवेलला आयुर्वेदात गिलोय असं म्हणतात. कोरोनासारख्या मोठ्या आजारातून बरं होताना गुळवेलचं सेवन फायदेशीर ठरतं. गुळवेल काढा आणि चूर्ण या स्वरुपात गुळवेलचं सेवन केलं जातं.
7.कडूलिंबाची पानं- आयुर्वेद सांगतं की रोज सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची पानं चावून खायला हवीत. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शिवाय त्वचा विकार रोखण्यास, बरे करण्यास मदत होते.
8.अश्वगंधा- चयापचय सुधारण्यास , वजन कमी करण्यास अश्वगंधाचं नियमित सेवन फायदेशीर असतं. बुरशीजन्य आजारात अश्वगंधा हा परिणामकारक असल्याचं आयुर्वेद तज्ज्ञ म्हणतात.
9. जिरे- स्वयंपाकात जिरे फोडणीसाठी वापरले जातात. पण जिरे पाण्यात भिजवून ते पाणी पिणं उपकारक समजलं जातं. जिऱ्यात तंतूमय घटक असतात, थियामिन, फॉस्फरस, पोटॅशिअम , कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम हे घटक विपूल असतात. बुरशीजन्य आजारात जिऱ्याचा उपयोग ते भाजून पाण्यात भिजवून करावा.
10.लसूण- लसूण हा फक्त मसाल्याचा तिखटपणा वाढवण्यासाठीच उपयोगी असतो असं नाही तर लसणामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. लसणात कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम आणि फॉस्फरस हे घटक असतात. या सर्व गुणांमुळे लसूण म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारं आणि बुरशीस रोखणारं स्वयंपाकघरातलं औषध आहे.
11.लवंग- लवंगात अपायकारक जिवाणू मारण्याची क्षमता असते. लवंगाच्या सेवनानं पोटातील कृमी मरतात. लवंग हे बुरशीविरोधक आणि वेदनाशामक आहे. त्यामुळे लवंगाचं नियमित सेवन फायदेशीर आहे.