Join us  

कणिक मळून ठेवली की काळी पडते? 4 सोप्या युक्त्या, कणिक पांढरी शुभ्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2021 6:52 PM

कणिक मळून फ्रीजमधे ठेवली की ती काळी पडते, या पोळ्यांना चव नसते तसेच पोळ्यांचा रंग काळपट पडतो, पोतही बिघडतो. यामुळे मूड जातो. पण पर्याय नाही म्हणत याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण मळून ठेवलेली कणिक फ्रेश ठेवण्याच्या युक्त्या आहेत.

ठळक मुद्देकणिक मळताना जास्त पाणी वापरलं तर ती सैल आणि काळी पडते. कणिक पाण्याऐवजी दुधानं मळली तर कणिक दीर्घकाळ फ्रेश राहाते आणि पोळ्याही स्वादिष्ट लागतात. कणिक मळून ती फ्रिजमधे ठेवायची असेल तर ती एअर टाइट कंटेनरमधे ठेवावी.

आजच्या धावपळीच्या जगण्यात दोन्ही वेळेस पोळ्या करणं हे मोठं कठीण आणि वेळखाऊ काम ठरतं. पण पर्याय नाही म्हणून ते करावंच लागतं. पण त्यातही घाईच्या वेळेत वेळ वाचावा यासाठी उपाय म्हणून अनेकजणी सकाळी घाईची वेळ असेल तर सकाळच्या पोळ्यांसाठीची कणिक रात्रीच मळून ठेवतात तर रात्री उशिर होतो म्हणून रात्रीच्या पोळ्यांची कणिक सकाळी मळून ठेवतात. यात पोळ्या करण्याचा वेळ वाचतो ही सोय होत असली तरी मळून फ्रीजमधे ठेवलेली कणिक काळी पडते, या पोळ्यांना चव नसते तसेच पोळ्यांचा रंग काळपट पडतो, पोतही बिघडतो. यामुळे मूड जातो. पण पर्याय नाही म्हणत याकडे दुर्लक्ष केलं जातं.

Image: Google

पण कणिक मळून ठेवली आणि ती नंतर वापरुन तिच्या पोळ्या केल्या तरी ती ताज्या कणकेसारखी दिसेल अशा युक्त्याही आहेत. या युक्त्यंनी कणिक मळल्यास मळून ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या ताज्या कणकेच्या पोळ्यांइतक्याच चवदार आणि मऊ लागतात.

मळलेली कणिक काळी पडू नये म्हणून..

1. आता मळून ठेवलेल्या कणकेच्या उशिरा पोळ्या करायच्या असतील तर कणिक मळताना खूप पाणी वापरु नये. यामुळे कणीक जास्त वेळ ठेवली की ती सैल होते, काळी पडते आणि या कणकेच्या पोळ्याही नीट येत नाही.

Image: Google

2. मळलेली कणिक काळी पडू नये म्हणून कणिक मळताना कणकेत थोडं साजूक तूप किंवा तेल घालावं आणि मग कणिक मळावी. यामुळे मळलेली कणिक दीर्घकाळपर्यंत ताजी राहाते. अशा प्रकारे मळलेल्या कणकेच्या पोळ्याही मऊ येतात.

3. कणिक जर पाण्याऐवजी दुधानं मळली तर पोळ्यांना उत्कृष्ट स्वाद येतो, पोळ्या नरम येतात आणि कणिक भरपूर वेळ ताजी राहाते. जर प्रवास करायचा असेल आणि सोबत पोळ्या न्यायच्या असतील तर कणिक ही दुधानंच मळायला हवी. 

Image: Google

4. कणिक मळून ती फ्रिजमधे ठेवायची असेल तर ती एअर टाइट कंटेनरमधे ठेवावी. पोळ्या करण्याच्या पंधरा मिनिटं आधी फ्रिजमधून काढून ठेवावी आणि पोळ्या कराव्यात. एयर टाइट कंटेनरमधली कणिक अगदी ताज्या मळलेल्या कणकेसारखी दिसते.