स्वयंपाक शिकताना आपण सुरुवातीला डाळ - भात हे बेसिक जेवण बनवायला शिकतो. मात्र, डाळ - भात बनवणं हे काम अजिबात सोपे नाही. भात बनवताना अनेकदा पाण्याचे प्रमाण जास्त होते. यामुळे भाताचा गचका अथवा फडफडीत होतो. भातावरुनही कसा स्वयंपाक जमतो हे पाहिलं जातं. प्रत्येक घरात विविध प्रकारचे तांदूळ आढळतात.
मात्र, तांदूळ कोणताही असो, भात फळफळीत बनवण्यासाठी काही ट्रिक्स आपल्या कामी येतात. बिर्याणी अथवा पुलाव बनवताना बासमती तांदळाचा वापर जास्त करतात. तो भात नीट जमला नाही तर खाण्याची मजाच जाते. भात मोकळा व्हावा असं वाटत असेल तर, काही टिप्स आपल्या कामी येतील.
भात मोकळा शिजवण्यासाठी ट्रिक
भात मोकळा आणि सुटसुटीत शिजवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ चांगले निवडून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. व त्यात पाणी टाकून तांदूळ चांगले धुवून घ्या, त्यातील एक्स्ट्रा पाणी काढून घ्या. असे केल्याने तांदळामधील स्टार्च निघून जाईल. ही प्रक्रिया निदान तीन वेळा तरी करा.
तांदूळ तीन वेळा धुतल्यानंतर त्याच बाऊलमध्ये पाणी टाकून ३० मिनिटे तसेच ठेवा. याने तांदूळ मऊ होतील. व शिजण्यास देखील मदत होईल.
आता एका मोठ्या पॅनमध्ये पाणी उकळवत ठेवा. त्यात दालचिनी, वेलची, चक्रफुल, लवंग, चवीनुसार मीठ टाका. त्यानंतर भिजवत ठेवलेले तांदूळ टाका. यामुळे भात खाताना मसाल्यांचा सुवास दरवळेल. हे तांदूळ ५ - ७ मिनिटे शिजवा. त्यावर झाकण झाकू नका. भात शिजल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. हे तांदूळ बाजूला १० मिनिटे तसेच ठेवा. अशा प्रकरे सुटसुटीत मोकळा भात तयार. आपण हा भात पुलाव अथवा बिर्याणीसाठी वापरू शकता.