नॉनस्टिकची भांडी आपण वापरतोच. मात्र सोशल मीडियात नेहमी चर्चा असते की नॉनस्टिक भांडी वापरु नयेत. अनेकजण तर त्या भांड्यांमुळे अनेक आजार होतात असंही सांगतात. पण खरंच नॉनस्टिक भांडी वापरणं फायद्याचं असतं की तोट्याचं? शरीराला त्यानं कितपत अपाय होतो? एक नक्की की या भांड्यांना कोटिंग असतं त्यामुळे ही भांडी वापरताना काळजी घ्यायला हवी.
आपण कधीही त्या भांड्यांसोबत आलेलं माहितीपत्रक वाचत नाही त्यामुळे नक्की काय नी कशी काळजी घ्यायची हे कळत नाही.
(Image : google)
नॉनस्टिकची भांडी वापरताना काय काळजी घ्याल?
वैद्य राजश्री कुलकर्णी सांगतात..
१. टेफ्लोन कोटींगची भांडी लोकप्रिय आहेत. त्यामध्ये पॉलिटेट्रा फ्लूरो एथिलीन या रसायनाचा वापर करून कोटिंग केलं जातं.
परंतु नवीन संशोधनानुसार अनेक गोष्टी काळजीत टाकणाऱ्या आहेत. नेहमी अशा भांड्यांमध्ये शिजवलेलं अन्न खाल्ल्यामुळे यकृत, मूत्रपिंड,थायरॉइड ,वंध्यत्व इ. आजार उद्भवू शकतात.
२. ही भांडी काही पदार्थ न ठेवता नुसती गॅसवर तापायला ठेवली तर त्यातून येणाऱ्या वाफा किंवा धूर हा विषारी असतो इतकंच नव्हे तर तो कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण देऊ शकतो.
३. ही भांडी जास्त वेळ तापत राहिली तर जास्त तापमानाला त्यांचा वरचा थर हळूहळू निघू लागतो. ब्रेक डाऊन होऊ लागतो आणि मग त्यातून विषारी घटक अन्नपदार्थात मिसळू शकतात.
३. म्हणून ही भांडी रिकामी तापत ठेवू नयेत. खूप जास्त गरम होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
४. या भांड्यात स्वयंपाक करताना गॅस मध्यम असावा.
५. तवा, कढई यातील पदार्थ हलवण्यासाठी लाकडी चमचे,उचटणी यांचा वापर करावा
६. भांडी घासण्यासाठी सौम्य साबण आणि मऊ घासणी वापरावी. त्या भांड्यांवर चरे पडले की ती आरोग्यास धोकादायक ठरतात. त्यामुळे नवीन भांडी आणावीत.