Join us

कोबीची भाजी आवडत नाही? मग कोबीचा मस्त पराठा खा! कोबी पराठ्याची खुसखुशीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 18:11 IST

कोबी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने आहारात समावेश असायलाच हवा...

ठळक मुद्देभाजी खाण्यापेक्षा कोबीचे पराठे मस्त पर्यायलहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीनी खातील असे कोबी पराठे नक्की ट्राय करा

(छायाचित्रे - अर्चनाज किचन, पूनम पौल)

कोबीची भाजी म्हटलं की आपण नाक मुरडतो. कोबीची कोशिंबीर, वडे किंवा चायनिज पदार्थांमध्ये कोबी ठिक आहे, पण कोबीची भाजी कशीही केली तरी ती खायचा वैताग येतो. पण कोबी आरोग्यासाठी फायदेशीर असून त्याचे गरमागरम, खुसखुशीत पराठे केल्यास? रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर हे पराठे नक्की ट्राय करुन बघा. हे पराठे तुम्ही नाश्ता, जेवण असे कोणत्याही वेळेला खाऊ शकता. थंडीच्या दिवसात गरम पराठा आणि त्यावर लोणी किंवा तूप घेतल्यास तोंडाला चव तर येतेच पण या दिवसांत जास्त भूक लागत असल्याने दोन पोटभरीचेही होते. 

(Image : Google)

साहित्य - 

कोबी - पाव किलो आलं-मिरची-लसूण पेस्ट - एक मोठा चमचा धने जीरे पावडर - अर्धा चमचामीठ - चवीनुसार हिंग- हळद - पाव चमचा कोथिंबीर - पाव वाटी चिरलेलीगव्हाचे पीठ - ४ वाट्या तेल - पाव वाटी

कृती - 

१. कोबी धुवून बारीक किसून घ्यावी.२. आलं मिरची लसूण पेस्ट करुन घ्यावी.३. कणकेमध्ये कोबी, आलं मिरची लसूण पेस्ट, धनेजीरे पावडर, हिंग, हळद, चिरलेली कोथिंबीर, मीठ घालावे. ४. हे सगळे व्यवस्थित एकजीव मळून घ्यावे.५. पराठे लाटून तेलावर खरपूस भाजावेत.६. हे पराठे तूप किंवा लोणी आणि लोणचे, खोबऱ्याची ओली चटणी यांबरोबर अतिशय मस्त लागतात. 

(Image : Google)

कोबीचे आरोग्यासाठी फायदे 

१. कोबीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन आटोक्यात राहण्यासाठी कोबी अतिशय उत्तम असतो. याबरोबरच कोबीमध्ये बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे असल्याने कोबीचा आहारात समावेश असायला हवा.

२. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी आहारात नियमित कोबीचा समावेश करायला हवा. कोबी चिरुन किंवा किसून त्यावर काळी मिरी, लिंबू, मीठ घालून खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते. एकूणच पचनाच्या तक्रारींसाठी कोबी अतिशय फायदेशीर ठरतो.

३. डोळ्यांच्या तक्रारी असणाऱ्यांनी आहारात नियमितपणे कोबीचा समावेश करायला हवा. त्यामुळे डोळ्यांच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. 

४. कोबीमधील घटकांमुळे कर्करोगाचा धोका टळतो. तसेच कोबीमुळे मज्जातंतूंचे आणि मेंदूचे काम सुरळीत होते. 

५. कोबी खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो. 

६. कोबीत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात. यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते. त्यामुळे हाडांच्या तक्रारी उद्भवू नयेत यासाठी नियमित कोबी खायला हवा. 

७. कोबीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असे घटक असतात. व्हिटॅमिन सी हे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असते, त्यामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी आहारात नियमित कोबीचे सेवन करायला हवे. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीभाज्याकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.