Join us  

भर पावसात गरमागरम सूप प्यावंसं वाटतंच ना, घ्या मंचाव सूपची ही सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2022 9:14 AM

भाज्या पोटात जातील असे मंचाव सूप घरच्या घरी ट्राय करा....

ठळक मुद्देभर पावसात गरमागरम काही प्यावसं वाटत असेल तर सूप हा उत्तम पर्याय आहे.भाज्या पोटात जाणारे आरोग्याला उपयुक्त असलेले सूप पावसाळ्यात नक्की प्या

पावसाळा म्हटलं की बाहेर गार हवा पडलेली असते. अशा हवेत आपल्याला हमखास सर्दी-खोकल्याचा त्रास होतोच. या हवेत आपल्याला सतत चहा-कॉफी प्यायची नाहीतर गरम भजी खायची इच्छा होते. पण त्यापेक्षा पौष्टीक आणि तरीही गरम असे मस्त काही पोटात गेले तर? सूप हा या ऋतूमध्ये घेण्यासाठी सर्वात उत्तम उपाय आहे. घशाला आराम देणारा आणि सर्दी कमी करण्यासाठी फायदेशीर असलेले मंचाव सूप पावसाळ्यात आवर्जून ट्राय करु शकतो. सूप ही साधारण हॉटेलमध्ये गेल्यावर प्यायली जाणारी गोष्ट पण संध्याकाळच्या जेवणाआधी घ्यायला आपण घरीही गरमागरम सूप करु शकतो. यासाठी घरात उपलब्ध असलेल्या, तुम्हाला आवडत असलेल्या कोणत्याही भाज्या तुम्ही वापरु शकता. चला तर पाहूया मंचाव सूप करायची सोपी पद्धत कोणती...

(Image : Google)

साहित्य -

१. मशरुम - अर्धी वाटी

२. बेबी कॉर्न - अर्धी वाटी

३. कोबी - पाव वाटी 

४. बिन्स - पाव वाटी 

५. मिरची - १ 

६. मिरपूड - पाव चमचा 

७. सोया सॉस - २ चमचे 

८. चिली सॉस - २ चमचे 

९. आलं-लसूण पेस्ट - १ चमचा 

१०. लिंबाचा रस - १ चमचा     

११. मीठ - चवीपुरते

१२. कॉर्न फ्लोअर - १ ते २ चमचे

१३. कांद्याची पात - अर्धी वाटी 

१४. तेल - २ चमचे 

कृती - 

१. कढईत तेल घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची.

२. यामध्ये सगळया भाज्या घालून त्या किमान ५ मिनीटे परतून घ्यायच्या.

३. यामध्ये पाणी घालून मग मीरपूड, सोया सॉस, चिली सॉस घालायचा. 

४. कॉर्न फ्लोअरमध्ये पाणी घालून ते या मिश्रणात घालायचे, सूप दाटसर होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. 

५. मीठ, लिंबाचा रस आणि मिरची घालायची. 

६. या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग गरमागरम सूप प्यायला घ्यायचे. 

७. बाजारात मिळणाऱ्या नूडल्स तळून या सूपमध्ये घालून खायला छान लागतात. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाऊस