थंडीत ताटात गरमागरम छान काहीतरी असावं असं वाटतं. सारख्या कोणत्या भाज्या, उसळी आणि आमट्या करायच्या सारखं हेल्दी तरी काय करणार असे प्रश्न घरातील तमाम गृहीणींना पडलेले असतात. अशावेळी गरमागरम कुळथाचं पिठलं आणि भाकरी किंवा कुळथाचं पिठलं आणि गरम वाफेचा भात समोर आला तर घरातील मंडळी त्यावर ताव मारल्याशिवाय राहणार नाहीत. याबरोबरच कुळथाच्या पिठाचे सूप, शेंगोळे असे अनेक प्रकार करता येतात. कुळथाचे पीठ ज्यापासून बनते त्या हुलग्यांची उसळही अप्रतिम लागते. थंडीच्या दिवसांत आरोग्यासाठी उपयुक्त असे हुलगे म्हणजेच कुळीथाचे पीठ आवर्जून खायला हवे. कुळथामध्ये आरोग्याला फायदेशीर अनेक घटक असल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी आवर्जून कुळीख खायला पाहिजे असे आहारतज्ज्ञ सांगतात. साधारणपणे भारतात कोकण पट्ट्यात उगवणारी आणि खाल्ले जाणारे हे कडधान्य आता देशाच्या कोणत्याही भागात सहज उपलब्ध होते. लोह आणि कॅल्शियमचे जास्त प्रमाण असलेले हे कडधानू्य महिलांन आणि लहान मुलांच्या हाडांसाठी तसेच शरीरातील रक्ताचे आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी खायला सांगितले जाते. पाहूयात कुळथाचे आरोग्यासाठी असणारे विविध फायदे
१. मूतखडा ही हल्ली अगदी सामान्य समस्या झाली आहे. मूतखडा असेल तर रुग्णाला पोटाच्या खालच्या बाजूला असह्य वेदना होतात. कुळथाच्या पीठीचा आहारात समावेश केल्यास या वेदना काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.
२. महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असताना पोट, पाठ, कंबर, पाय दुखणे असह्य होते. हा त्रास कमी व्हावा म्हणून कुळीथ उपयुक्त ठरते.
३. कुळीथामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराची समस्या असलेल्यांनी आहारात कुळथाचा जरुर वापर करावा. तसेच ज्यांना हृदयविकाराचा त्रास नाही त्यांनीही भविष्यात हा त्रास उदभवू नये म्हणून कुळीथ खायला हवे.
४. ज्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे लोह आणि हिमोग्लोबिनची पातळी कमी आहे अशांनी आवर्जून कुळीथ खायला हवे. लोह आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी कुळीथ उत्तम पर्याय आहे.
५. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण कुळथामुळे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. कुळथामध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते आणि सतत भूक लागत नाही. आपसूकच कमी खाल्ले गेल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. फॅटस बर्निंग एजंट म्हणून कुळथाचा उत्तम उपयोग होतो. तेव्हा तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात कुळथाचा जरुर समावेश करायला हवा.
६. कुळीथामध्ये फ्लेवोनॉईड आणि पोलीफेनॉईल हे घटक मुबलक असतात. हे घटक यकृत आणि स्वादुपिंडाच्या कार्यासाठी चांगले असतात. आहारात कुळीथाचा समावेश असेल तर तुमचे रक्त शुद्ध होते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. जर हे कार्य सुरळीत झाले नाही तर शरीरातील पित्त, कफ आणि वात दोष वाढतात आणि आजारपणाला सुरूवात होते. यासाठीच यकृताचे कार्य सुरळीत होणे फार गरजेचे असते. त्यामुळे ज्यांना हे त्रास आहेत त्यांना कुळीथ खाण्याचा सल्ला दिला जातो.
७. जुलाब अथवा डायरिया सारख्या आजारपणात कुळीथ खाण्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो. अती प्रमाणात अथवा पाण्यासारखे जुलाब झाल्यामुळे शरीरातील ताकद कमी होते. जुलाबावाटे शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे रुग्णाला खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. मात्र कुळीथातील घटकांमुळे जुलाब थांबण्यास तर मदत होतेच पण तरतरी येते. जुलाब झाल्यास कुळीथाचे सूप किंवा कढण प्यायला दिल्यास तोंडालाही चव येते.
८. युरीन इन्फेक्शन, मूळव्याध यांसारख्या समस्यांमध्येही कुळथाने आराम मिळतो. लघवीसाठी सतत जळजळ, आग होत असेल तर कुळीथाचा आहारात समावेश केल्यास नक्कीच फायदा होतो. यामुळे लघवी साफ होण्यास मदत होते. लहान मुलांनाही कुळथाचे कढण नियमित द्यावे.