रानभाज्या करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या, याविषयी सांगताना नीलिमा जोरवर म्हणाल्या की, रानभाज्या काही आपण नेहमी खात नाही. बऱ्याच जणींना तर रानभाज्यांची माहितीही नसते. एरवी आपण ज्या भाज्या खातो, त्या भाज्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. त्यात आपल्याला हवे तसे पदार्थ आपण टाकू शकतो किंवा वगळू शकतो. परंतू रानभाजीचे मात्र तसे नसते. रानभाजी करताना तिची जी रेसिपी आहे, ती आपण त्या प्रांतातल्या लोकांकडून जाणून घेतली पाहिजे आणि त्याच पद्धतीने ती केली पाहिजे.
असे करण्याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे प्रत्येक रानभाजी करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. तसेच रानभाज्यांमध्ये काही विषारी घटकही असतात. जेव्हा आपण ती भाजी व्यवस्थित शिजवून, वाफवून घेतो किंवा त्यामध्ये एखादा नवा घटक टाकतो, तेव्हा तिच्यातले विषारी घटक कमी होतात आणि ती भाजी खाण्यायोग्य बनते. तसेच ती खाणाऱ्याला कोणत्याही प्रकारे बाधत नाही. उदाहरणार्थ बडद्याचे कंद असतात त्याचीही भाजी करतात. ते कंद चांगले लागले, म्हणून तसेच कच्चे खाल्ले तर त्याचा तब्येतीवर विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे बडद्याचे कंद नेहमीच उकडून खावेत. तसेच बडद्याच्या पानांची भाजी किंवा अळूच्या पानांची भाजीही नुसती कधीच केली जात नाही. कारण त्यामुळे घशात खूप खवखव होते.
या भाज्या चिरताना सुद्धा हाताला खाज येते. त्यामुळे या काही भाज्या चिंच घातल्याशिवाय करताच येत नाहीत. राजगिरा, कुर्डू, चाईचा वेल अशा काही भाज्या यामध्ये इतर कोणताही पदार्थ न टाकता तशाच केल्या तरी चालतात.काही काही रानभाज्या अतिशय कडू असतात. अशा भाज्या सगळ्यात आधी उकडून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर त्यांच्यातले पाणी काढून टाकले पाहिजे. असे केले तरच त्या खाण्यायोग्य होतील.