Join us  

भर उन्हात नेहमीची पोळी-भाजी नको वाटते? जेवण चविष्ट करतील असे ५ गारेगार पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2022 10:53 AM

अशावेळी जेवणाच्या सोबत काहीतरी चटपटीत, गारेगार असेल तर जेवणाची रंगत वाढते. पाहूयात उन्हाळ्यात जेवणासोबत करता येतील अशा पदार्थांचे पर्याय...

ठळक मुद्देजेवणासोबत कलिंगड, खरबूज, अननस, द्राक्षे अशी गारेगार एनर्जी देणारी फळे असतील तर जेवण जाते.ताक किंवा मठ्ठ्यामुळे गारेगार तर वाटतेच पण शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होते.

उन्हाचा तडाखा वाढत गेला की अंगाची लाहीलाही होते आणि नुसतं पाणी प्यावसं वाटतं. उन्हामुळे अन्न कमी जाते. या काळात शरीराला पाण्याची जास्त गरज असली तरी अन्नही पोटात जायलाच हवे ना. नुसते पाणीच नाही तर त्याबरोबरच उकाडा कमी व्हावा म्हणून आपण गारेगार ताक, सरबत, मिल्क शेक किंवा आइस्क्रीम यांचा मनसोक्त आस्वाद घेतो. हे सगळं खरं असलं तरी भर उन्हात दुपारी नुसती पोळीभाजी खाणं नको वाटतं. पण जेवल्याशिवाय अंगात ताकद राहणार तरी कशी? अशावेळी जेवणाच्या सोबत काहीतरी चटपटीत, गारेगार असेल तर जेवणाची रंगत वाढते. इतकेच नाही तर किमान आपण जेवण आनंदाने करु शकतो. पाहूयात उन्हाळ्यात जेवणासोबत करता येतील अशा पदार्थांचे पर्याय...

(Image : Google)

१. दहीबुंदी

करायला अगदी सोपा आणि झटपट होणारा हा पदार्थ आपण उन्हाळ्याच्या दिवसांत नक्की करु शकतो. गारेगार दही, ताक आपण उन्हाळ्यात आवर्जून खातो. पण नुसते दही ताक खाण्यापेक्षा त्यामध्ये बुंदी घातली तर जेवणाची रंगत वाढते. यासाठी घट्ट दही फेटून त्यामध्ये मीठ, साखर, धनेजीरे पावडर, तिखट घालावे. जेवायला बसताना बुंदी पाण्यातून काढून या दह्यात घालावी आणि जेवणासोबत घ्यावी. दह्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे दही आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पोट शांत राहण्यासाठीही उन्हाळ्यात दही-ताक खाण्याचा सल्ला दिला जातो. 

२. खमन काकडी

काकडी हा उन्हाळ्यात आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ. पाण्याचे प्रमाण जास्त असलेली काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी भरुन निघते. गारेगार काकडी खाल्ल्याने पोट तर भरतेच पण डिहायड्रेट होण्यापासूनही आपण वाचतो. त्यामुळे सॅलेड म्हणून नुसती काकडी चिरुन घेण्यापेक्षा काकडी किसून किंवा चोचून त्यामध्ये मीठ, साखर आणि गोड दही घालावे. त्याला वरुन मिरची आणि जिऱ्याची फोडणी द्यावी आणि वरुन कोथिंबीर घालावी. त्यामुळे उन्हात पोळी-भाजी कोरडी न वाटता जेवणाला मजा येते.

३. ताक किंवा मठ्ठा

हे उन्हाळ्यात आवर्जून प्यायले जाणारे पदार्थ. ताक किंवा मठ्ठ्यामुळे गारेगार तर वाटतेच पण शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होते. आलं, लसूण, जीरं, कोथिंबीर आणि मीठ, साखर घालून केलेला मठ्ठा आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. ताकामुळे पचनाच्या तक्रारी तर दूर होतातच आणि आरोग्याच्या इतरही अनेक समस्यांवर ताक उपयुक्त असते. त्यामुळे भर उन्हात जेवणासोबत ताक किंवा मठ्ठा असेल तर जेवायला मजा येते. 

४. कलिंगड आणि खरबूज 

पाणीदार आणि रसदार गोड असणारी ही फळे उन्हाळ्यात बाजारात येतात. शरीरातील पाण्याची पातळी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपण ही फळे उन्हाळ्यात आवर्जून खातो. जेवणासोबत कलिंगड, खरबूज, अननस, द्राक्षे अशी गारेगार एनर्जी देणारी फळे असतील तर जेवण जाते. त्यामुळे जेवणासोबत एखादी फ्रूट डिश सोबत असेल तर जेवण चांगले होते. या फळांवर चाट मसाला किंवा थोडं काळं मीठ घातलं की ती आणखी छान लागतात. 

(Image : Google)

५. दहीभात 

खाराची किंवा लाल मिरची आणि जिऱ्याची फोडणी देऊन केलेला दहीभात उन्हाळ्यात पोटाला आणि मनाला शांती देणारा ठरतो. या फोडणीत कडिपत्ता आणि शेंगदाणे घातले त्याची रंगत आणखीच वाढते. भात गार करुन त्यामध्ये दही, साखर, मीठ आणि फोडणी घालावी. त्यामुळे पोळी-भाजी कोरडी वाटली तरी या दहीभाताने पोट भरते आणि गारही वाटते.  

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससमर स्पेशल