उपवासला नेहमीची भगर आमटी आणि साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. काहीतरी वेगळं, चटपटीत खावंसं वाटतं. मुळातच उपवासाला उगाचंच तोंड बांधल्यासारखं वाटतं. त्यात तेच तेच पदार्थ असले की पोट भरत नाही आणि मनही. उपवास म्हटला की प्रत्येकजण साबुदाणा, भगर, दही या गोष्टींची तजवीज घरात करतंच. याच गोष्टींचा वापर करुन हवाहवास चटपटीत पदार्थ करता येतो. डोसा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. पण उपवासाला कुठे खाता येतो डोसा ( dosa for fasting) असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर म्हणजे उपवासाला साबुदाणा भगरीचा( sago samak rice dosa) चविष्ट, चटपटीत, हलका फुलका तरीही पोटभरीचा उपवासाचा डोसा तयार करता (how to make dosa for fasting) येतो.
Image: Google
उपवासाचा डोसा कसा करणार?
उपवासाचा डोसा करण्यासाठी 1 कप साबुदाणा, 2 मोठे चमचे दही, अर्धा कप भगर , चवीनुसार मीठ आणि पाणी घ्यावं. साबुदाणा डोसा करताना साबुदाणे धुवून घ्यावेत. त्यात थोडंसं पाणी ठेवून ते चार तास भिजवावेत. भगरही धुवून घ्यावी. ती अर्धा तास भिजत घालावी. मिक्सरच्या भांड्यात भिजलेला साबुदाणा, भगर, दही आणि थोडं पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावं. मिश्रण खूपच घट्ट वाटल्यास थोडं पाणी घालावं. मिश्रण खूपच घट्ट असू नये. मिश्रणात चवीनुसार मीठ घालावं.
Image: Google
नाॅन स्टिक तवा गरम करावा. तव्यावर थोडे तेलाचे थेंब घालावेत. तव्यावर 2 मोठे चमचे पाणी घालावं. तवा सूती कापडानं पुसून घ्यावा. अशा प्रकारे डोशासाठी तवा तयार करुन घ्यावा. गरम तव्यावर साबुदाणा भगरीचं दोन चमचे मिश्रण घालून ते भराभर गोलाकार पसरुन घ्यावं. डोसा दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर खरपूस भाजावा. डोसा भाजताना थोड्या तेलाचा वापर करावा. दही घालून केलेल्या शेंगदाणा चटणी आणि उपवासाच्या बटाटा भाजीसोबत हा डोस छान लागतो. साबुदाणा भगरीचा डोसा आणखी चविष्ट करण्यासाठी चवीनुसार हिरवी मिरची घ्यावी. मिरचे आणि जिरे एकत्र वाटून घ्यावे. मिरचीचं वाटण साबुदाणा भगरीच्या मिश्रणात घालाव. मिश्रणात भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यास डोसे चविष्ट होतात.