Join us  

डोसा आइस्क्रिम आणि गुलाबजाम पिझ्झा, हे असले भयंकर पदार्थ लोक का करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 3:52 PM

सुबक कोनदार समोशाला पूर्ण चेचून त्यात चीझ घालून देतात. पाणीपुरीवर मॅगी टाकतात. वडापावमध्ये मेयोनिज घुसवतात; पण हे सगळं का, कशासाठी?

ठळक मुद्दे सध्या स्वयंघोषित फूड ब्लॉगर शेवाळागत फोफावलेत. हातात मोबाईल आणि बोलण्याची क्षमता यावर वाट्टेल ते करतात.

शुभा प्रभू साटम

शिरीष कणेकर यांनी फार वर्षे आधी एक विधान केलेले होते. तेव्हाच्या रणजित या खलनायकाने आपला नग्न फोटो प्रसिद्ध केला होता त्याला अनुसरून कणेकर लिहितात, आधीच रणजित त्यात नग्न. डाएटवर असणाऱ्या मंडळींनी तो फोटो समोर ठेवावा की अन्न इच्छाच मरेल. हे वाक्य आठवलं कारण आता मला त्या फोटोला मागे टाकतील अशी अनेक उदाहरणं दिसतात. जी समाजमाध्यमात व्हायरल असतात. ताजे उदाहरण म्हणजे डोसा आईस्क्रिम.कोणी शोधले आणि त्याहून अधिक म्हणजे कोणी खाल्ले हे कळत नाही.मात्र सध्या स्वयंघोषित फूड ब्लॉगर शेवाळागत फोफावलेत. हातात मोबाईल आणि बोलण्याची क्षमता यावर वाट्टेल ते करतात.त्यातले हे डोसा आइस्क्रिम.गेल्या काही वर्षांत असल्या पदार्थांना लोकप्रियता मिळतेय.

(Image : Google)

मॅगी खीर, मॅगी समोसा, बिर्याणी डोसा, गुलाबजाम पिझ्झा, ओरिओ बिर्याणी. अगदी रणजितचा फोटोही कलात्मक वाटेल असे हे पदार्थ.मुळात या मागची मानसिकता कळत नाही. औट घटकेची लोकप्रियता, व्हायरल होणे?हेच कारण असेल का? हल्ली पोस्टला व्ह्यू किती यावरून तुमचे मूल्यमापन होते. त्यावरून लोकप्रियताही जोखली जाते.त्यापायी जरा सनसनाटी काही हवं म्हणून असे अतरंगी पदार्थ केले जात असतील का?तर हे डोसा आइस्क्रिमच नाही. स्वस्त साध्या, घरगुती डोशाला आधीच लोकांनी भ्रष्ट केलेय. एकेकाळी साधा, मसाला, मुळगापुडी, घी रवा मसाला,रवा साधा असे नेमके उपप्रकार असणारा हा पदार्थ. आज शेजवान, पावभाजी, म्यागी, समोसा, चिली, मेक्सिकन, चीझ, भेळ अशा अनेक चवीत मिळतो.पण आता मुळात प्रश्न येतो हे सारं का?

(Image : Google)

आणि फक्त डोसा नाही. आजकाल वाट्टेल ते करतात. सुबक कोनदार समोशाला पूर्ण चेचून त्यात चीझ घालून देतात. पाणीपुरीवर मॅगी टाकतात. वडापावमध्ये मेयोनिज घुसवतात.एक ताजे उदाहरण, ढोकळा खांडवी आइस्क्रिम आणि या पदार्थाला सहा हजारांहून अधिक लाईक्स.हे सारे काय आहे? सतत नावीन्याची हौस की तात्कालिक लोकप्रियता? कौन है ये लोग? कहासे आते है?गोड, तिखट, आंबट, कडू, तुरट या चवीवर पूर्ण खाद्यसंस्कृती पेलली जाते. नावीन्य आणि बाष्कळ आचरटपणा यात फरक असतो. निव्वळ व्ह्यू मिळावेत या न्यायाने हे चालते.यावरून एक आठवलं. वाढदिवसाला केक कापणे नवे नाही; पण आज तो केक पूर्ण तोंडावर फासतात,डोक्यावर अंडी फोडतात, जितका वाह्यातपणा जास्त तितके तुमची लोकप्रियता अधिक असे समीकरण असावे किंवा सध्याच्या आभासी/व्हर्च्युअल युगात हा नियम रूढ झाला आहे. अर्थात इथे सर्वच तात्कालिक असल्याने हे सारेही फार टिकणार नाही अशी आशा माझ्यातील खवैयाला आहे.पण एक प्रश्न उरतो, डोसा आइस्क्रिम किंवा ढोकळा पिझ्झा यांची चव नक्की कशी सांगायची? किंवा अगदी ५०/१००वर्षांनी कोणी खाद्य इतिहास किंवा दस्त तयार करायला घेतले तर हे प्रकार पाहून त्याची गणना कशात केली जाईल? की त्यापेक्षा अधिक भीषण पदार्थ येऊन तेच रूढ झालेले असतील.काय पदार्थ येऊ शकतात अजून अतरंगी भयंकर?वरण आइस्क्रिम? बिर्याणी पिझ्झा? बैगन हलवा?कल्पनाही करवत नाही.पण केवळ अतरंगी व्हायरल व्ह्यूजसाठी पदार्थांवर हा अन्याय सहन न होणारा आहे..(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)shubhaprabhusatam@gmail.com

टॅग्स :अन्न