आपल्याकडे नाष्त्याला पोहे, चहा चपाती, उपमा सारखं सारखं रिपिट व्हायल लागलं की डोसा, अप्पम खाण्याची लहर येते. पण नेहमीच बाहेरचं आणून खाणं शक्य नसतं. अनेकांना ते परवडण्यासारखं नसतं. बाहेरचं सतत आणून खाणं आरोग्यासाठी कितपत योग्य असाही प्रश्न पडतो. अनेकदा डोसे घरात बनवत असताना जाळीदार येत नाही, बाहेरच्या डोश्यासारखी चव त्याला नसते अशा अनेक तक्रारी महिलांच्या असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोसा जाळीदार येण्यासाठी त्याची एक सोपी रेसेपी आणि काही ट्रिक्स सांगणार आहोत.
साहित्य
२०० ग्रॅम रवा
1/4 वाटी ओलं खोबरं किंवा डेसिकेटेड खोबरं
1/2 वाटी दही
2 वाट्या गरम पाणी
1 टीस्पून मीठ
1 टीस्पून इनो किंवा बेकिंग सोडा
गरजेपुरतं तेल
कृती
सगळ्यात आधी मिक्सर मधे रवा, ओलं खोबरं, मीठ आणि दही घालून त्यात दोन वाट्या गरम पाणी घालून दोन मिनिटे मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
गरम पाण्याने रवा चांगला फुलून येतो. मग त्यात इनो किंवा बेकिंग सोडा घालून परत जरा मिक्सर मधून बॅटर फिरवून घ्यावे.
तव्यावर तेल किंवा तूप घालून डोसा बॅटर घालून दोन्ही बाजूंनी डोसा छान खरपूस भाजून घ्यावा. डोसा छानच जाळीदार होतो. गरमागरम मऊ, जाळीदार डोसे तुम्ही चटणी किंवा सांभारसह खाऊ शकता.