ख्रिसमस, न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी एकमेकांकडे राहायला जाण्याचे, नाइट आऊटला जाण्याचे बेत आखले जातात. तसेच या काळात बाहेर हुडहुडी भरवणारी थंडी पडलेली असल्याने सतत गरमागरम चहा, कॉफी प्यावीशी वाटते. त्यातही घसा खवखवत असेल, थोडा कफ असेल तर घशाला आराम मिळण्यासाठी रात्रीच्या वेळी कॉफी प्यायला प्राधान्य दिले जाते. अनेक जण जेवण झाल्यावर मित्रमंडळींना भेटायला किंवा नातेवाईकांकडे जातात आणि मग कॉफी पिणे होते. रात्रीच्या वेळी कॉफी प्यायल्याने आपली झोप उडते हे आपल्याला माहित असते. मात्र समोरचा आग्रह करतो म्हणून किंवा गारठा आहे म्हणून आपण तो विचार बाजूला ठेऊन कॉफी घेण्याला प्राधान्य देतो. त्यामुळे कॅफेन तर शरीरात जातेच पण जास्त एनर्जेटीक वाटल्याने झोप उडते. पुढे बराच वेळ झोप न लागल्याने त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतात. त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यावर, झोपण्याच्या आधी कोणत्याही कारणाने अशाप्रकारे कॉफी पिणे योग्य आहे का? त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर याविषयी सांगतात....
- चहा कॉफी प्यायल्याने तरतरी येत असेल, दूध पोटात जात असेल ,घशाला आराम मिळत असेत तर ती प्रमाणात पिणे ठिक आहे.
- जेवणात पुरेसा संतुलित आहार घेतला असेल तर कॉफीची आवश्यकता नसते.
- रात्री झोपताना कॉफी प्यायल्याने एनर्जेटीक वाटते त्यामुळे झोप उडते.
- कोणत्याही खाण्यानंतर कॅफेन शरीरात गेल्यास शरीरात लोह आणि कॅल्शियम शोषले जाण्याची प्रक्रिया बंद होते. त्यामुळे जेवणानंतर कॉफी घेणे घातक ठरते.
- कॉफीमध्ये आपण एक चमचा साखर घातली तर २० ग्रॅम कॅलरीज मिळतात. आपण साधारणपणे २ चमचे म्हणजे ४० ग्रॅम कॅलरीज घेतो. रात्रीच्या जेवणानंतर इतक्या कॅलरीजची आवश्यकता नसते. त्यामुळे अनावश्यक कॅलरीज शरीरात जमा होतात. त्याचे कालांतराने आरोग्यावर विपरित परिणाम दिसून येतात.
- चहा किंवा कॉफी ही एनर्जी येण्यासाठी दोन जेवणांच्या मधे घेतल्यास ठिक आहे. परंतु जेवण झाल्यावर त्याचे सेवन टाळायला हवे. अनेकदा सकाळच्या नाश्त्यानंतर कॉफी घेतली जाते. पण ती घेताना मध्ये १ ते १.५ तासाचा अवधी जाणे गरजेचे आहे.
- दिवसातून केवळ १.५ ते २ कप चहा किंवा कॉफी प्यावी. मात्र कोणतेही जेवण झाल्यावर कॅफेनचे सेवन करु नये.
- जेवणानंतर कॉफी प्यायल्याने पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात. कॉफी जास्त प्रमाणात घेतल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवतो.
- यातही हल्ली ब्लॅक कॉफी पिण्याचे फॅड आहे. पण ब्लॅक कॉफीही शरीरासाठी घातकच असते.