Lokmat Sakhi >Food > थंडीत गरमागरम प्या आमसूल आणि चिंचेचं सार, मस्त पारंपरिक कढण! परफेक्ट, सोपी झटपट कृती

थंडीत गरमागरम प्या आमसूल आणि चिंचेचं सार, मस्त पारंपरिक कढण! परफेक्ट, सोपी झटपट कृती

एकीकडे कडाक्याची थंडी आणि समोर मस्त वाफाळतं सार आलं तर? कल्पनेनेही छान वाटणारी हे वेगवेगळे हेल्दी सार ट्राय तर करुन बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 12:50 PM2021-11-30T12:50:34+5:302021-11-30T13:09:38+5:30

एकीकडे कडाक्याची थंडी आणि समोर मस्त वाफाळतं सार आलं तर? कल्पनेनेही छान वाटणारी हे वेगवेगळे हेल्दी सार ट्राय तर करुन बघा

Drink hot in the cold. Perfect, simple instant recipe | थंडीत गरमागरम प्या आमसूल आणि चिंचेचं सार, मस्त पारंपरिक कढण! परफेक्ट, सोपी झटपट कृती

थंडीत गरमागरम प्या आमसूल आणि चिंचेचं सार, मस्त पारंपरिक कढण! परफेक्ट, सोपी झटपट कृती

Highlightsतोंडाला चव आणणारे आणि आरोग्यासाठी चांगले सार थंडीत नक्की घ्याथंडी उबदार करायची असेल तर आहारात गरमागरम सार, सूप, कढण हवेच

कुडकुडवणारी थंडी म्हटली की आपल्याला सतत गरम चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटते. घशाला आराम मिळावा आणि गारठा जाणवू नये म्हणून थंडीत आपण सतत गरम काहीतरी घेतो. पण चहा, कॉफीपेक्षा शरीरात ऊब निर्माण व्हावी आणि तब्येतही ठणठणीत राहावी यासाठी गरमागरम सार प्यायले तर? तोंडाला चव आणणारी आणि पारंपरिक पद्धतीने केले जाणारे हे वेगवेगळे सार थंडीच्या दिवसांत शरीराला ऊब देतील. आपल्या आजी, आई आपल्याला प्रेमाने करुन देत असलेले हे सार काळाच्या ओघात काहीसे मागे पडले, पण हिवाळ्याच्या निमित्ताने आपण सारचे हे प्रकार नक्की ट्राय करुया. जेवणाच्या आधी, मधल्या वेळेत किंवा अगदी जेवणाबरोबरही हे सार तुम्ही घेऊ शकता. लहान बाळांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत घरातील प्रत्येकाची थंडी पळवतील असे हे आमसूल, चिंच आणि कडधान्यांचे सार कसे करायचे पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

आमसूल सार 

साहित्य - 

आमसूल - ७ ते ८ 
गूळ - गूळ - अर्धी वाटी 
कोथिंबीर - पाव वाटी चिरलेली 
तिखट - चवीनूसार 
मीठ - चवीनूसार 
फोडणीचे साहित्य
तूप - २ चमचे 

कृती -

१. आमसूल स्वच्छ धुवून घ्या 
२. तूपाची फोडणी करा. त्यात जीरे, हिंग, हळद घाला. 
३. फोडणी झाली की त्यात अंदाजे पाणी घाला
४. पाण्यात धुतलेले आमसूल, गूळ, मीठ आणि तिखट घाला
५. आमसूलाचा रंग उतरायला सुरुवात होईपर्यंत चांगली उकळी येऊद्या. 
६. उकळी आली की गॅस बारीक करा आणि वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घाला

हे गरमागरम सार प्यायला अतिशय उत्तम लागते. आमसूल तब्येतीसाठी चांगले असते. आमसूलात असलेले व्हीटॅमिन ए आणि इ हे घटक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. थंडीत अनेकदा बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असते. आमसूलात असणाऱ्या अँटीऑक्सिडंटसमुळे त्याचा आहारात समावेश केल्यास पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत होण्यासाठी आमसूल अतिशय उपयुक्त ठरते. एरवी आपल्या आहारात आमसूला आमटी सोडून फार वापर होत नाही. मात्र असे सार केल्यास ते प्यायला सगळ्यांनाच आवडते. घरात कोणाला बरे नसेल किंवा तोंडाची चव गेल्यासारखे झाले असेल तर हे सार आवर्जून प्यावे. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी आमसूल उपयुक्त असते. मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव झाल्यास हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता होऊ शकते. त्यावर उपाय म्हणून आमसूल अतिशय उपयुक्त ठरते. 

चिंचेचे सार 

साहित्य -

चिंच - ४ ते ५ बिया 
गूळ - अर्धी ते पाऊण वाटी 
तिखट - चवीनुसार 
मीठ - चवीनुसार
ओले खोबरे - अर्धी वाटी खोवलेले  
कोथिंबीर - बारीक चिरलेली पाव वाटी 
फोडणीचे साहित्य 
तूप - २ चमचे 

कृती -

१. चिंच एका भांड्यात पाण्यात भिजत घालावी. कोमट पाण्यात घातल्यास लवकर भिजते. 
२. तासाभराने हाताने चिंच कुसकरावी व हे पाणी गाळणीने गाळून घ्यावे. चिंचेला बराच गर असतो, त्यामुळे असे दोन ते तीन वेळा करावे. 
३. या गाळलेल्या पाण्यात आणखी पाणी घालून गॅसवर उकळायला ठेवावे. त्यात मीठ, गूळ आणि तिखट घालावे. 
४. दुसरीकडे लहान कढईमध्ये तूपाची फोडणी करावी. यासाठी फोडणीत मोहरी, जीरे, हिंग, हळद घालावे.
५. चिंचेच्या पाण्यावर वरुन ही फोडणी द्यावी. उकळी आल्यावर त्यामध्ये ओले खोबरे आणि कोथिंबिर घालावी. 
६. चवीनुसार आणखी गूळ, मीठ घालू शकता.  

दक्षिणेकडील ही रेसिपी अगदी झटपट होणारी आणि तोंडाला चव आणणारी आहे. चिंच आबंट असली तरी आरोग्याला अतिशय फायदेशीर असते. आंबट-गोड चवीचे हे सार भात किंवा खिचडीसोबत खूप छान लागते. जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी तुम्ही या साराचा नक्की उपयोग करु शकता. तुम्ही आवडीनुसार यामध्ये आलं-लसूण पेस्ट घाली शकता. किंवा तिखटाऐवजी लाल मिरचीची फोडणी देऊ शकता. चिंचेमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम असे घटक असतात. यामुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्यांपासून सुटका व्हायला मदत होते. पोट साफ होण्यासाठी, शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी, तोंड स्वच्छ होण्यासाठी चिंच अतिशय उपयुक्त असते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. कडधान्याचे कढण 

साहित्य - 

१. शिजवलेल्या कोणत्याही कडधान्याचे पाणी 
२. ताक - अंदाजे  
३. लसूण पाकळ्या - ५ ते ६ 
४. कडिपत्ता - ७ ते ८ पाने 
५. साखर - १ चमचा 
६. मीठ - चवीनुसार
७. लाल मिरची - २ 
८. ओले खोबरे - अर्धी वाटी
९. कोथिंबीर - पाव वाटी चिरलेली 
१०. फोडणीचे साहित्य 

कृती -

१. कडधान्य शिजवताना त्याला थोडे जास्त पाणी घालावे. 
२. शिजवून झाल्यानंतर हे पाणी बाजूला एका पातेल्यात घेऊन त्यामध्ये साखर, मीठ आणि ताक घालावे.
३. हे सगळे एकजीव करुन साराइतके पातळ होईल असे बघावे. यामध्ये ओले खोबरे घालावे 
४. कढईत फोडणी देऊन त्यामध्ये लालम मिरची, कडिपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात 
५. फोडणी तडतडली की त्यामध्ये हे एकत्र केलेले मिश्रण घालावे आणि उकळी येऊ द्यावी
६. थोडावेळाने गॅस बारीक करुन यामध्ये कोथिंबीर घालावी. 

या कढणामुळे जेवणाची लज्जत वाढण्यास मदत होते. तसेच पानाला आणखी एक पदार्थ मिळतो. कडधान्यांमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे घटक असतात. तसेच ताकही आरोग्याला अतिशय चांगले असते. हे कढण भात, पोळी किंवा नुसते प्यायलाही खूप छान लागते. थंडीत एकदम तरतरी येण्यासाठी किंवा घशाला आराम मिळण्यासाठी हे गरमागरम कढण लज्जत आणणारे ठरते. 
 

Web Title: Drink hot in the cold. Perfect, simple instant recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.