थंडी म्हटली की आपल्याला भरपूर भूक लागते. या दिवसांत शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळण्यासाठी आपण आहारात फळं, भआज्या, सुकामेवा, तीळ, बाजरी अशा पदार्थांचा समावेश करतो. पण या काळात आवर्जून खाल्ले जातात ते म्हणजे पौष्टीक लाडू. शरीराचे पोषण होण्यासाठी डींकाचे, सुकामेव्याचे पौष्टीक लाडू या काळात आवर्जून केले जातात.आता हे लाडू करायचे म्हणजे नेमके कसे असा प्रश्न अनेकींना पडू शकतो. तर सोप्या पद्धतीने भरपूर ऊर्जा मिळणारे हे पौष्टीक लाडू करता येतात. गूळ, गव्हाचे पीठ, सुकामेवा यांसारखे पौष्टीक घटक असल्याने डायबिटीस असणाऱ्यांनाही हे लाडू खाता येतात. लहान मुले, वयस्कर व्यक्तींना थंडीत हे लाडू खाल्ल्याने शरीराला चांगली उष्णता मिळण्यास मदत होते. पाहूया हे लाडू झटपट कसे करायचे (Dry fruits Laddu Winter Special Recipe)...
साहित्य -
१. तूप - अर्धा कप
२. बदाम काप - पान कप
३. काजू काप - पाव कप
४. आक्रोड काप - पाव कप
५. पिस्ते काप - पाव कप
६. बेदाणे - पाव कप
७. जाड पोहे - अर्धा कप
८. किसलेले सुके खोबरे - अर्धा कप
९. गव्हाचे पीठ - एक कप
१०. गूळ - चवीनुसार
कृती -
१. एका कढईत पाव कप तूप घालून त्यामध्ये बदाम, काजू, आक्रोड, पिस्ते हा सगळा सुकामेवा घालून चांगला परतून घ्या.
२. खरपूस भाजले गेल्यावर त्यामध्ये पोहे आणि सुकं खोबरं घालून सगळं चांगलं परतून घ्या आणि हे सगळे एका बाऊलमध्ये काढून घ्या.
३. कढईत उरलेले पाव कप तूप घेऊन त्यात एक कप गव्हाचे पीठ घाला आणि हे पीठ चांगले लाल रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या.
४. यामध्ये आधी भाजलेले सगळे जिन्नस एकत्र करा आणि सगळे एकजीव होईपर्यंत पुन्हा चांगले परतून घ्या.
५. शेवटी मनुके आणि गूळ घाला. साधारण अर्धा ते पाऊण कप गूळ पुरतो. हा गूळ किसलेला किंवा बारीक चिरलेला असल्याने चांगला एकजीव होतो.
६. सगळे मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढा आणि एकसारखे लाडू वळा. लाडू वळताना मिश्रण कोरडे वाटले तर हाताला थोडे तूप किंवा दूध लावून वळा.