Join us  

दुधी भोपळ्याच्या भाजीला सगळेच तोंड वाकडं करतात? नाश्त्याला करा दुधीचे गट्टे, सोपी-चविष्ट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 4:00 PM

Dudhi Bhopla Bottle gourd Easy Testy Breakfast Recipe : अतिशय हेल्दी आणि तरीही खूप चविष्ट लागणारा हा पदार्थ कसा करायचा पाहूया...

रोज नाश्त्याला वेगळं काय करायचं आणि रोज वेगळी कोणती भाजी करायची हे रोज रात्री झोपताना गृहिणींच्या डोळ्यासमोर असलेले महत्त्वाचे प्रश्न. मुलांच्या आणि घरातील सगळ्यांच्याच पोटात पौष्टीक काहीतरी जावं यासाठी महिलांचा सतत अट्टाहास चाललेला असतो. बेकरी उत्पादने, तळकट गोष्टी आणि बाहेरचं जास्त खाल्ले जाऊ नये म्हणून घरातच वेगवेगळे पदार्थ करण्याचा महिलांचा आग्रह असतो. नाश्त्याला सतत पोहे, उपमा, खिचडी, इडली हे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण अतिशय हेल्दी आणि तरीही खूप चविष्ट लागणारा एक खास पदार्थ पाहणार आहोत. दुधी भोपळा म्हटलं की अनेकांच्या कपाळावर नकळत आठ्या येतात. आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेला या दुधीचा हलवा एकवेळ आपण आवडीने खातो पण त्याची भाजी म्हटली की आपल्याला अगदी नको होऊन जाते. पाहूयात दुधी भोपळ्यापासून करता येणारा नाश्त्याचा हा आगळावेगळा पदार्थ (Dudhi Bhopla Bottle gourd Easy Testy Breakfast Recipe)...

साहित्य - 

१. दुधी भोपळा - किसलेला २ वाट्या 

२. ज्वारीचे पीठ - १ वाटी 

३. बेसन - अर्धी वाटी

४. आलं-मिरची लसूण पेस्ट - १ चमचा 

(Image : Google)

५. मीठ - चवीनुसार 

६. धणे-जिरे पावडर - अर्धा चमचा

७. तीळ - १ चमचा 

८. सुकं खोबरं - अर्धी वाटी 

९. कोथिंबीर - अर्धी वाटी 

१०. तेल - अर्धी वाटी

११. जीरं, हिंग हळद - अर्धा चमचा 

१२. कडीपत्ता - ८ ते १० पाने 

कृती -

१. भोपळा स्वच्छ धुवून सालं काढून किसून घ्यावा. 

२. त्यामध्ये ज्वारीचे पीठ आणि बेसन घालावे. 

३. यात आलं-मिरची लसूण पेस्ट, मीठ, धणे-जीरे पावडर घालून सगळे एकजीव करुन घट्टसर पीठ मळून घ्यावेत.

४. कोथिंबीरीच्या वड्यांप्रमाणे हे पीठ पोळपाटावर लांबसर वळून घ्याव्यात.

(Image : Google)

५. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवावी त्यात हे गट्टे वाफवायला ठेवावेत. 

६. कढईत तेल घालून त्यामध्ये जीरं, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. यामध्ये कडीपत्ता, तीळ आणि खोबरं घालून चांगले परतून घ्यावे. 

७. वाफवलेले गट्टे या फोडणीत घालून चांगले परतावे.

८. वरुन हिरवीगार कोथिंबीर घालून हे गरमागरम गट्टे खायला घ्यावेत.

९. दही, सॉस किंवा हिरवी चटणी, चिंचेची चटणी असे कशासोबतही हे गट्टे अतिशय छान लागतात.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.