दुधी भोपळा असं नाव घेतलं तरी अनेक जण नाक मुरडतात. भोपळ्याची भाजी तर अनेकांना नकोच असते. पण भोपळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळे त्याचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा असे सांगितले जाते. मग दुधी भोपळ्याचे पराठे, रायतं असे काही ना काही पदार्थ आपण करतो. भोपळ्याचा हलवाही फार छान लागतो. पण थंडीच्या दिवसांत गरमागरम आणि हेल्दी काहीतरी खायचं असेल तर दुधी भोपळ्याची खीर हा उत्तम पर्याय ठरु शकतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ही खीर आवडीने खातील आणि त्यात भोपळा आहे हे त्यांना कळणारही नाही. पाहूयात ही खीर कशी करायची आणि भोपळा खाण्याचे फायदे (Dudhi Bhopla Bottle Gourd Kheer Recipe)...
साहित्य
१. दिड कप दुधी (किसलेला)
२. १ चमचा तूप
३. ५ कप दूध
४. पाव कप साबुदाणा (भिजवलेला ३० मिनिटे)
५. पाव कप मलई
६. अर्धा कप मावा/खवा (किसलेला)
७. ३ चमचे काजू
८. ३ थेंब हिरवा रंग
९. पाऊण कप साखर
१०. अर्धा चमचा वेलची पावडर
कृती -
१. दुधी भोपळा स्वच्छ धुवून सालं आणि बिया काढून किसून घ्यायचा.
२. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप घालून हा किस चांगला परतून घ्यायचा.
३. मग त्यामध्ये दूध घालून मिश्रण चांगले शिजवायचे.
४. यामध्ये साबुदाणा घालून ५ मिनीटे शिजवायचे.
५. मग यामध्ये क्रिम, मावा आणि काजूचे काप घालायचे.
६. चांगले एकजीव करुन घ्यायचे आणि त्यात हिरवा रंग आणि साखर घालायची.
७. घट्टसर होईपर्यंत खीर चांगली शिजवायची.
८. वेलची पावडर घालून खीर एका बाऊलमध्ये काढून थंड व्हायला ठेवायची.
दुधी भोपळ्याचे ५ फायदे
१. दुधीमध्ये सोडियम, लोह, पोटॅशियम, फायबर, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते
२. दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेटेड राहते. दुधी भोपळ्याचे नियमित सेवन केल्याने शरीर सुदृढ राहते.
३. पोटाशी निगडित समस्यांशी दोन हात करण्यासाठी दुधी भोपळा उपयुक्त असतो. यामुपळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.
४. वेट लॉसमध्ये आपली भूक नियंत्रित ठेवण्यासाठी दुधीचा रस उपयुक्त ठरतो. यातील पोषक तत्वे शरीराला खूप फायदेशीर ठरतात.
५. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी दुधी भोपळ्याचा वापर केला जातो. नियमित रस प्यायल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात आणि चेहऱ्यावर नवी चमक येते.