दुधी भोपळा म्हटलं की घरातील सगळे हमखास नाक मुरडतात. भोपळ्याची भाजी तर अनेक जण अजिबात खात नाहीत. पण भोपळा आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. उत्तम आरोग्यासाठी आहारात जास्तीत जास्त भाज्या असायला हव्यात असे आपण ऐकतो. मग भाजीऐवजी दुधीचा हलवा, दुधी भोपळ्याचे दही घालून रायते असे प्रकार आपण करतो. भोपळ्याची भाजी आवडत नसेल तरी भोपळ्याचे थोडे वेगळे आणि चविष्ट असे पदार्थ केल्यास भोपळा आवडीने खाल्ला जातो. दुधी भोपळ्याचे मुटके हा त्यातीलच एक प्रकार. झटपट होणारी आणि चविष्ट लागणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. यामुळे भोपळाही पोटात जाईल आणि वेगळा पदार्थ केल्याने घरातील सगळेही खूश होतील. पाहूयात हे मुटके कसे करायचे (Dudhi Bhopla Bottle Gourd Mutke Recipe).
साहित्य -
१. दुधी भोपळा - किसलेला २ वाट्या
२. ज्वारीचे पीठ - १ वाटी
३. बेसन - १ वाटी
४. आलं-मिरची लसूण पेस्ट - १ चमचा
५. मीठ - चवीनुसार
६. धणे-जिरे पावडर - अर्धा चमचा
७. तीळ - १ चमचा
८. सुकं खोबरं - अर्धी वाटी
९. कोथिंबीर - अर्धी वाटी
१०. तेल - अर्धी वाटी
११. जीरं, हिंग हळद - अर्धा चमचा
कृती -
१. भोपळा स्वच्छ धुवून सालं काढून किसून घ्यावा.
२. त्यामध्ये ज्वारीचे पीठ आणि बेसन घालावे.
३. यात आलं-मिरची लसूण पेस्ट, मीठ, धणे-जीरे पावडर घालून सगळे एकजीव करावे.
४. याचे हातावर मुटके करुन घ्यावेत.
५. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवावी त्यात हे मुटके वाफवायला ठेवावेत.
६. कढईत तेल घालून त्यामध्ये जीरं, हिंग आणि हळद घालावे.
७. त्यामध्ये तीळ आणि खोबरं घालून चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये हे मुटके घालून चांगले परतावे.
८. वरुन हिरवीगार कोथिंबीर घालून हे मुटके गरमागरम खायला घ्यावेत.