दिवाळीची मौज मस्ती झाल्यानंतर आता पोरांची सुट्टी देखील संपत आली, काही ठिकाणी शाळा देखील सुरु झाल्या. प्रत्येक आईला शाळा सुरु झाली की एकच प्रश्न पडत असतो. लेकरांच्या डब्ब्याला द्यायचे काय ? काही लहान मुलं पोष्टिक भाज्या खात नाही. त्यामुळे युक्ती लढवून आईंना चविष्ट आणि पोषक पदार्थ बनवून द्यावा लागतो. बहुतांश मुलं दुधी भोपळा खाण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे आपण दुधी भोपळ्याचे इडली बनवून मुलांना देऊ शकता. दुधी भोपळ्यापासून बनवलेली इडली चवीलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. काही लोकांना दुधी भोपळा भाजी स्वरूपात आवडत नाही. मात्र, त्यांना आपण चविष्ट इडली बनवून देऊ शकता. चला तर मग झटपट आणि बनवायला सोपी असणारी दुधी भोपळ्याची इडलीची रेसिपी जाणून घेऊयात.
या रेसिपीसाठी लागणारं साहित्य
एक कप बारीक रवा, किसून घेतलेला दुधी भोपळा, अर्धा कप दही, चवीनुसार मीठ, अर्धा कप पाणी, तेल, जिरं, मोहरी, उडीद डाळ, कडी पत्ता, लाल मिरची, कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम, दुधी भोपळ्याचे साल काढून बारीक किसून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या, तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं आणि मोहरी टाका. आता त्यात उडीद डाळ टाकावे. यासह कडी पत्ता आणि लाल मिरची देखील टाकावे. हे मसाले चांगले भाजून झाल्यानंतर त्यात एक कप बारीक रवा टाका. आणि हे सर्व मिश्रण चांगले भाजून घ्या. मसाले भाजून झाल्यानंतर हे मिश्रण एका बाउलमध्ये बाजूला थंड होण्यासाठी काढून ठेवा.
थंड झाल्यानंतर या मिश्रणात पाणी आणि दही टाका आणि चांगले मिक्स करून घ्या. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर २० ते २५ मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्या. २० मिनिटांनंतर त्यात किसून घेतलेला दुधी भोपळा टाकावा, आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करावे. आणि शेवटी कोथिंबीर टाकावी.
इडलीच्या साच्याला चांगले तेल लावा आणि त्यात बनवलेले तयार मिश्रण टाका आणि इडली जशी वाफेवर शिजवता तसे शिजवून घ्या. अश्याप्रकारे बाकीचे इडली देखील शिजवून घेणे. चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर इडली तयार आहे. हि इडली आपण खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसह खाऊ शकता.