Join us  

दसऱ्याला घरीच श्रीखंड करायचं? ५ सोप्या गोष्टी-परफेक्ट श्रीखंड जमेल, चुकण्याची तर शक्यताच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 5:39 PM

Dussehra Dasra how to make shrikhand at home cooking tips : वेलची आणि केशर घालून केलेले पारंपरिक श्रीखंड करताना लक्षात ठेवा या टिप्स...

श्रीखंड आणि आम्रखंड हे आपल्याकडील पारंपरिक मिष्टान्न. दसऱ्याच्या दिवशी अनेकांकडे आवर्जून श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्या, बटाट्याची भाजी हा बेत केला जातो. आता बाजारात श्रीखंड सहज मिळत असूनही चक्का आणून केलेल्या श्रीखंडाची चव काही औरच असते. विकत मिळणाऱ्या पदार्थाला घरातल्या व्यक्तीने प्रेमाने केलेल्या पदार्थाची सर नक्कीच येत नाही. पूर्वी दह्याचा चक्काही घरी केला जायचा, पण आता तितका वेळ नसल्याने बरेच जण चक्का विकत आणून त्याचे श्रीखंड करतात (Dussehra Dasra how to make shrikhand at home cooking tips) .  

श्रीखंड म्हटल्यावर त्यात वेगळे काय असणार असे काहींना वाटू शकते. पण हा चक्का फेटण्याची, मुरवण्याची एक खास पद्धत असते. त्या पद्धतीने केले तर ते श्रीखंड जास्त छान होते. तसेच प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असल्याने प्रत्येकाची चवही वेगळी येते. काही जण फळं घालून फ्रूटखंड करतात तर काही जणं सुकामेवा, आंब्याचा पल्प असे काही ना काही घालून याचे वेगवेगळे प्रकार ट्राय करतात. पण वेलची आणि केशर घालून केलेले पारंपरिक श्रीखंड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्याला छान चव येते पाहूया...

(Image : Google)

१. चक्का शक्यतो आदल्या दिवशी आणून त्यात साखर घालून तो थोडा हलवून ठेवा. म्हणजे ती साखर चांगली मुरुन एकजीव होते आणि श्रीखंड छान लागते. 

२. श्रीखंडामध्ये केशर घालायचे असल्यास ते थेट श्रीखंडामध्ये घालू नये. एका वाटीत दूध घेऊन केशर आधीच दुधात फेटून ठेवा आणि मग श्रीखंडात मिक्स करा. यामुळे केशराचा स्वाद छान लागतो. असे केल्याने रंगही नीट मिक्स होतो. 

३. चक्का घट्टसर असेल तर पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्या. हाताने फेटलेले आवडत असल्यास दह्याच्या गाठी आणि साखर अगदी मऊ होईपर्यंत फेटा. मात्र तुम्हाला थोड्या गाठी हव्या असतील तर तशाच ठेवा. 

(Image : Google)

४. चक्का आणून श्रीखंड करायचे असल्यास ते फ्रिजमध्ये न ठेवता बाहेरच मुरायला ठेवा. बाहेर ठेवल्याने ते थोडे आंबट होते आणि आंबट-गोड चव जास्त छान लागते. 

५. सुकामेवा किंवा फळांचे तुकडे श्रीखंडात घालायचे असतील तर ते तुकडे चांगले बारीक असावेत. म्हणजे ते मिळून यायला मदत होते. लहान तुकडे असतील तर ते खायलाही चांगले लागतात. फळांमुळे पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे फळं एकदम ऐनवेळी घालावीत. 

 

टॅग्स :अन्ननवरात्रीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.दसरा