दत्तजयंती म्हणजे दत्तगुरुंचा जन्मदिवस. महाराष्ट्रात आणि देशात ठिकठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. दत्ताची उपासना करणारे साधक या निमित्ताने श्रीदत्ताचे गुरुचरीत्र पारायण वाचतात. प्रत्येक सण, ऋतू यांनुसार आपल्या आहारातही बदल होतो. उन्हाळ्यात गुढी पाडव्याला आपण कडुलिंब खातो, संक्रांतीला तीळ खातो त्याचप्रमाणे दत्तजयंतीला आवर्जून सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी आपण दत्ताच्या मंदिरात गेलो तर आपल्याला आवर्जून हा सुंठवड्याचा प्रसाद दिला जातो. आता सुंठवडाच का असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडू शकतो. तर थंडीच्या दिवसांत होणारे कफासारखे आजार दूर व्हावेत, शरीरातील उष्णता टिकून राहावी यासाठी सुंठवडा अतिशय फायदेशीर ठरतो. पाहूयात सुंठवड़ा कसा करायचा आणि त्याचे फायदे...
१. सुंठ हे आल्यापासून तयार होते. आले वाळले की त्याची पावडर केली जाते आणि त्यालाच आपण सुंठ म्हणतो. आयुर्वेदात सुंठाचे अतिशय महत्त्व सांगितले आहे. सुंठ उष्ण असल्याने थंडीच्या दिवसांत सर्दी-कफ यांपासून शरीराचे रक्षण व्हावे म्हणून सुंठ खाल्ले जाते.
२. थंडीच्या दिवसांत पाणी कमी प्यायल्याने बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशावेळी सुंठवडा खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत होण्यास त्याची चांगली मदत होते.
३. थंडीच्या दिवसांत अनेकांना हाडांचे विकार उद्भवतात. संधीवाताच्या समस्या असणाऱ्यांनाही या काळात त्रास होतो. अशावेळी सुंठ खाल्ल्यास हाडांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
४. पोटावर चरबी साठू नये म्हणूनही सुंठ उपयुक्त ठरतो. इतकेच नाही तर हृदयविकार, डायबिटीस यांसारख्या विकारांचा त्रास होऊ नये म्हणून सुंठ खाण्याचा फायदा होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत सुंठ खाणे फायदेशीर ठरते.
घरच्या घरी सुंठवडा कसा कराल?
साहित्य -
१. सुंठ पावडर - १ चमचा
२. काजू - ८ ते १०
३. बदाम- ८ ते १०
४. मनुके - १० ते १५
५. खारीक पूड - २ चमचे
६. खसखस - अर्धा चमचा
७. वेलची पूड - पाव चमचा
८. खडीसाखर - १ चमचा
९. पिठीसाखर - २ चमचे
१०. सुकं खोबरं - १०० ते १५० ग्रॅम
कृती -
१. बदाम, काजू, खोबरे कढईमध्ये भाजून घेऊन त्याची बारीक पूड करुन घ्या.
२. ही पूड घेऊन त्यामध्ये पिठीसाखर, सुंठ पावडर, खसखस, खारीक पावडर घाला.
३. हे सगळे मिश्रण चांगले एकजीव करुन सगळ्यात शेवटी त्यामध्ये खडीसाखर आणि मनुके घाला.
४. एकावेळी जास्त न खाता हा सुंठवडा अर्धा चमचा खा.