Join us  

१ वाटी तांदळाची लज्जतदार व्हेज बिर्याणी, १० मिनिटांत कुकरमध्ये होणारी सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2024 1:36 PM

Easy 10 Minuets Cooker Veg Biryani Recipe : रात्रीच्या जेवणाला किंवा विकेंडलाही फक्त बिर्याणी आणि एखादे सॅलेड असेल की पानात आणखी काही लागत नाही.

भाताचा कोणताही प्रकार अनेकांच्या आवडीचा विषय. थंडीच्या दिवसांत तर पानात गरमागरम भात असला की आणखी काही नसले तरी चालते. या काळात बाजारात बऱ्याच भाज्या उपलब्ध असल्याने पावभाजी, उंधियो, बिर्याणी असे भाज्या भरपूर लागणारे पदार्थ आवर्जून केले जातात. प्रामुख्याने दक्षिणेकडे केला जाणारा हा भाताचा प्रकार व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये उपलब्ध असतो. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण आवर्जून बिर्याणी ऑर्डर करतो. अशी लज्जतदार बिर्याणी घरी करायचे असेही आपण अनेकदा ठरवतो पण आपल्याला ती म्हणावी तशी जमतेच असे नाही (Easy 10 Minuets Cooker Veg Biryani Recipe) . 

कधी यातला मसाला गंडतो तर कधी तांदूळ हवा तसा फुलत नाही.कधी पाणी जास्त राहतं तर कधी आणखी काही.पण रात्रीच्या जेवणाला किंवा विकेंडलाही फक्त बिर्याणी आणि एखादे सॅलेड असेल की पानात आणखी काही लागत नाही. त्यामुळे थोडक्यात स्वयंपाक होतो आणि हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडत असल्याने त्यावर तावही मारला जातो.ही बिर्याणी झटपट आणि परफेक्ट होण्यासाठी कुकरमध्ये कशी करायची याची सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. 

(Image : Google)

१. गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये २ चमचे तेल आणि २ चमचे तूप घालायचे. 

२. यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी, वेलदोडा असे आपल्याला आवडतील ते खड्या मसाल्यातील जिन्नस घालायचे.

३. त्यात आलं-मिरची-लसूण पेस्ट आणि उभा चिरलेला कांदा आणि काजूचे काप  घालून हे सगळे चांगले परतून घ्यायचे. 

४. मग यामध्ये मटार, फ्लॉवर, बटाटा, ढोबळी मिरची, गाजर, फरसबी अशा आपल्याला आवडतात त्या उभट चिरलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या.

५. यात तिखट, मीठ, हळद आणि २ चमचे दही घालून हे सगळे चांगले एकजीव हलवून कुकरवर नुसते झाकण ठेवून २ मिनीटे वाफ काढून घ्यायची. 

६. मग यामध्ये पुदीन्याची पाने, २ चमचे बिर्याणी मसाला घालून हे सगळे पुन्हा चांगले हलवून एकजीव करायचे. 

७. १ ते १.५ वाटी मोठ्या आकाराचा स्वच्छ धुतलेला बासमती तांदूळ आणि तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरचे झाकण लावायचे. 

८. मध्यम आचेवर २ शिट्ट्या घेऊन गॅस बंद करायचा आणि मग झाकण पडल्यावर कोथिंबीर आणि तूप घालून ही गरमागरम बिर्याणी खायची. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.