साऊथ इंडीयन पदार्थ म्हणजेच इडली, डोसा, आप्पे, उतप्पा हे अनेकांच्या आवडीचे असतात. बाहेर खायला गेलं तरी तेलकट आणि मैद्याला पर्याय म्हणून अनेक जण साऊथ इंडीयन खाणे पसंत करतात. पोटभरीचे आणि हेल्दी असलेले हे पदार्थ करायलाही सोपे असल्याने विकेंडला किंवा एरवीही आवर्जून केले जातात. साऊथ इंडीयन म्हटले की डाळ आणि तांदूळ यांचे कॉम्बिनेशन हे आपल्या डोक्यात फिक्स असते. यामध्ये तांदळाचा वापर केलेला असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे ते हे पदार्थ खाणे टाळतात. इतकेच नाही तर तांदळाने बरेचदा अगदी कमी वेळात लगेच भूक लागते. पण तांदळाला ज्वारीचा पर्याय असेल तर? तांदळाप्रमाणेच ज्वारीपासून आपण अगदी तशीच मऊ लुसलुशीत इडली केली तर? करायला सोपी, पचायला हलकी आणि तरीही हेल्दी अशी ज्वारीची इडली कशी करायची पाहूया (Easy and healthy jowar Idli Recipe) ...
१. एका बाऊलमध्ये २ वाटी ज्वारी आणि पाव वाटी उडीद डाळ घेऊन ती २ ते ३ वेळा स्वच्छ धुवायची.
२. साधारण ६ ते ८ तासांसाठी म्हणजेच रात्रभर हे दोन्ही भिजवायचे.
३. सकाळी हे मिश्रण मिक्सरमधून थोडे जाडसर वाटायचे आणि आंबण्यासाठी ठेवून द्यायचे.
४. साधारण ५ ते ६ तासात हे पीठ आंबते. मग त्यामध्ये मीठ आणि अंदाजे पाणी घालून एकजीव करायचे.
५. आपण इडली पात्राला ज्याप्रमाणे तेल लावून त्यात इडलीचे पीठ घालतो. त्याचप्रमाणे पीठ घालायचे आणि १० ते १२ मिनीटे वाफ येऊ द्यायची.
६. अतिशय मऊ-लुसलुशीत आणि चविष्ट अशा इडल्या तयार होतात. सांबार किंवा चटणी कशासोबतही या इडल्या अतिशय छान लागतात.
७. याच पीठाचा आपण डोसा, उतप्पा, आप्पे असे इडलीच्या पिठाप्रमाणे काहीही करु शकतो.