दिवाळीच्या दिवसांत आपली खूपच धांदल असते. एकीकडे साफसफाई, दुसरीकडे फराळाची लगबग. कधी खरेदीला जायची गडबड कर कधी मुलांसोबत कंदिल, किल्ला करण्याचे नियोजन. हे सगळे करता करता आपल्याला रोजच्या स्वयंपाकाला वेळ होतोच असे नाही. किंवा दिवसभराची दगदग झाल्यावर आपल्या अंगात स्वयंपाक करायचा त्राणच राहत नाही. अशावेळी बाहेरुन काहीतरी ऑर्डर करण्याचा पर्याय निवडला जातो. पण बाहेरचे खाण्यापेक्षा अगदी झटपट काहीतरी छान करता आले तर (Easy and healthy makhana set dosa recipe)?
मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि झटपट होईल असा एक एकदम सोपा हेल्दी पदार्थ आज आपण पाहणार आहोत. साऊथ इंडियन पदार्थांमधील डोसा हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ. डोसा करण्याच्या विविध पद्धती आपल्याला माहित असतात. पण १० मिनीटांत होणारा आणखी एक खास हेल्दी आणि झटपट डोसा कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत. मखाणा या सुकामेव्यातील पदार्थाचा वापर करुन अगदी हॉटेलस्टाईल स्पाँजी डोसा कसा करायचा पाहूया...
१. मखाणे, रवा सम प्रमाणात आणि त्याहून अर्धे पोहे घ्यायचे.
२. हे सगळे दही आणि पाण्यात अर्धा तास भिजवायचे.
३. अर्धा तासानी हे सगळे पाणी घालून मिक्सरमधून चांगले बारीक करुन घ्यायचे.
४. मग या वाटलेल्या पीठामध्ये मीठ घालून ते चांगले एकजीव करुन घ्यायचे.
५. नंतर यामध्ये खायचा सोडा घालायचा, तो नसेल घालायचा तर पीठ ७ ते ८ तास आंबवण्यासाठी ठेवायचे.
६. पॅनला तेल लावून त्यावर पीठ घालायचे. आवडीनुसार यावर तिखट, कोथिंबीर असे काहीही घालू शकतो.
७. हा गरमागरम डोसा चटणीसोबत किंवा नुसताही छान लागतो.
८. मुलांना घाईच्या वेळी किंवा एरवीही नाश्त्याला आपण हा पदार्थ नक्कीच करु शकतो.