कधीकधी अचानक आपल्याला खूप गोड खायची इच्छा होते. मग आपण बाजारातून काहीतरी विकत आणतो. पण हे पदार्थ एकतर महाग असतात आणि त्यात वापरलेले साहित्य कितपत चांगले असते हे सांगता येत नाही. घरात गोड करायचं म्हटलं की आपण एकतर शिरा, खीर असं काहीतरी करतो. पण नेहमीपेक्षा वेगळं, पौष्टीक आणि तरीही घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून काही बनवायचं असेल तर मूग डाळ हलवा हा उत्तम पर्याय ठरु शकतो. मूगाच्या डाळीतून आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळत असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळींसाठीही ही रेसिपी पौष्टीक असते. मूग पचायला हलके असल्याने आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने हा हलवा जरुर ट्राय करा, तो नेमका कसा करायचा पाहूया
साहित्य -
१. मूग डाळ - १ ते १.५ वाटी
२. तूप - अर्धी वाटी
३. साखर - पाऊण वाटी
४. बदाम, पिस्ता, काजू - प्रत्येकी ५ ते ७
५. वेलची पूड - पाव चमचा
६. केशर - ३ ते ४ काड्या
७. दूध - पाव वाटी
कृती -
१. पिवळ्या मूगाची डाळ कढईमध्ये चांगली लालसर रंगावर परतून घ्यायची.
२. ही डाळ थोडी गार झाली की मिक्सरमध्ये त्याचा ओबडधोबड भरडा काढून घ्यायचा.
३. कढईत भरपूर तूप घालून हा भरडा पुन्हा एकदा चांगला परतून घ्यायचा.
४. तूपावर लालसर भाजल्यानंतर यामध्ये साखर आणि थोडेसे दूध घालून हे सगळे चांगले एकजीव करायचे.
५. यामध्ये वेलची पूड, सुकामेव्याचे काप आणि केशर घालून एक वाफ काढून घ्यायची.
६. गॅस बंद करुन हा गरमागरम हलवा खायला घ्यायचा.