बाहेर पावसाची संततधार असेल तर आपल्याला छान चविष्ट आणि गरमागरम काहीतरी खायची इच्छा होते. खूप पाऊस असेल तर आपल्याला बाहेरही जाता येत नाही अशावेळी घरातच काहीतरी करावं लागतं. पाऊस पडला की आपण साधारणपणे भजी, वडे असं काही ना काही करतो. पण असं तळकट काही खाण्यापेक्षा हेल्दी आणि तरीही चविष्ट पदार्थ केला तर तो पोटभरीचाही होतो आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाता येतो. इडली-सांबार हा कायमच अतिशय आवडीने खाल्ला जाणारा बेत. लहान मुलंही गरम लुसलुशीत इडली अतिशय आवडीने खातात. मुलांना डब्याला द्यायला किंवा बाहेर जाताना सोबत घ्यायला या इडल्या अतिशय चांगला पर्याय असतो. पाहूयात नेहमीचीच इडली थोडी वेगळ्या पद्धतीने जास्त पौष्टीक कशी करायची (Easy and healthy Moong Dal Idli Recipe)...
१. साधारण १ वाटी रवा घ्यायचा आणि त्यात २ चमचे घट्ट दही घालून ते चांगले एकजीव करुन घ्यायचे.
२. मूगाची डाळ ५ ते ६ तास भिजवून ती मिक्सरवर बारीक करुन ती या मिश्रणात घालायची.
३. त्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या, कांदा, किसलेले गाजर, शिमला मिरची कोथिंबीर अशा घरात उपलब्ध असतील त्या आणि आपल्याला आवडणाऱ्या भाज्या घालायच्या.
४. एका पॅनमध्ये तेल घालून त्यात मोहरी आणि कडीपत्ता घालून तो चांगला परतून घ्यायचा.
५. ही गरम फोडणी या पीठात घालायची आणि चांगली एकजीव करायची.
६. मग यामध्ये मीठ आणि सोडा घालून अंदाजे थोडं पाणी घालून मिश्रण परत एकजीव करायचं.
७. इडली पात्राला तेल लावून त्यामध्ये इडलीचं हे पीठ घालायचं आणि १० मिनीटे झाकण ठेवून इडल्या छान होऊ द्यायच्या.
८. या गरमागरम इडल्या खायला अतिशय छान लागतात. आवडत असल्यास तूप घालून किंवा चटणीसोबत नाहीतर नुसत्याही या इडल्या आपण खाऊ शकतो.