इडली म्हटलं की आपल्याला डाळ-तांदळाच्या पीठाची इडली डोळ्यासमोर येते. त्यासाठी डाळ-तांदूळ भिजवणे, वाटणे आणि ते आंबवणे अशी बरीच प्रक्रिया असते. ही इडली आपण सांबार किंवा चटणीसोबत खातो. तर काहीवेळा या इडलीच्या पीठात आपण किसलेल्या भाज्या, फोडणी असं घालून ती नेहमीपेक्षा थोडी वेगळी आणि चविष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण आज आपण एक थोडी वेगळ्या प्रकारची इडली पाहणार आहोत. ही इडली डाळीची असल्याने ती नेहमीच्या इडलीपेक्षा नक्कीच जास्त पौष्टीक होते (Easy and Healthy Moong Dal Idli Recipe).
मूगाची डाळ आपल्या घरात सहज उपलब्ध असते, तसेच ती पचायला हलकी असल्याने आहारात तिचा आवर्जून समावेश करण्यास सांगितले जाते. डाळीमधून शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळत असल्याने आहारात डाळींचा जास्तीत जास्त समावेश असायला हवा. म्हणूनच नेहमीच्या तांदळाच्या इडलीपेक्षा थोडी वेगळी, झटपट होणारी अशी मूगाची इडली कशी करायची पाहूया. ही इडली हेल्दी असून चविष्ट लागत असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ती खाता येते. नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठी या इडलीचा पर्याय नक्कीच चांगला होऊ शकतो.
१. साधारण १ वाटी मूग डाळ घेऊन ती १ तास पाण्यात भिजवून ठेवावी.
२. त्यानंतर पाणी काढून टाकून यामध्ये मिरची आणि पाणी घालून हे सगळे चांगले मिक्सर करुन घ्यावे.
३. यामध्ये आवडीनुसार गाजर, बीट यांसारख्या भाज्या किसून घालाव्यात.
४. अर्धी वाटी दही, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून हे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे.
५. कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, हिंग, उडीद डाळ आणि कडीपत्ता घालून फोडणी चांगली तडतडू द्यावी आणि या मिश्रणात घालावी.
६. यामध्ये थोडासा सोडा घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून इडल्या लावाव्यात.
७. या गरमागरम इडल्या नुसत्या किंवा चटणीसोबत अतिशय चविष्ट लागतात.