Join us  

हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या ताज्या भाज्यांचे करा चमचमीत कटलेट, पोटभर आणि पौष्टिक खाऊ-मुलांसह मोठ्यांसाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2024 1:29 PM

Easy and healthy Vegetable Cutlet Recipe : थोडं डोकं लढवलं तर मुलांच्या आवडीचे आणि तरीही पौष्टीक असे पदार्थ नक्की करता येतात.

थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर भाज्या असतात. या भाज्यांचा दर्जा चांगला असतो आणि किंमतही बेताची असते. या भाज्यांमध्ये मटार, मक्याचे कणीस, कोबी, जागर, बीट अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. आपल्या आहारात जास्तीत जास्त प्रकारच्या, रंगांच्या भाज्या, सॅलेड असावे असे सांगितले जाते. उत्तम आरोग्यासाठी ते चांगलेही असते. दुपारच्या जेवणाला आपण साधारणपणे पोळी भाजी, कोशिंबीर, आमटी असा पूर्ण स्वयंपाक करतो. पण नाश्त्याला आणि रात्रीच्या जेवणाला थोडे वेगळे काहीतरी असावे असे आपल्याला वाटते. घरात लहान मुलं असतील तर तेही पोळी भाजीला कंटाळतात आणि वेगळं काहीतरी कर असा आईकडे हट्ट करत असतात. मुलांना सतत वेगळं आणि तरीही पौष्टीक काहीतरी द्यायचं म्हणजे आईची कसरतच असते. पण थोडं डोकं लढवलं तर मुलांच्या आवडीचे आणि तरीही पौष्टीक असे पदार्थ नक्की करता येतात. पाहूयात असाच एक सोपा आणि सगळ्यांना आवडेल असा आगळावेगळा पदार्थ (Easy and healthy Vegetable Cutlet Recipe)...

१. सगळ्यात आधी घरात ज्या भाज्या असतील त्या स्वच्छ धुवून त्यापैकी बीट, गाजर, मक्याचे कणीस, मटार यांसारख्या भाज्या कुकरमध्ये अर्धवट शिजवून घ्यायच्या. 

२.  मग कोबी, बीट, गाजर, कणीस हे सगळे किसणीने बारीक किसून घ्यायचे. 

(Image : Google)

३. यामध्ये वाफवलेला मटार, फ्लॉवर अशा असतील त्या इतर भाज्या घालून उकडलेले २ ते ३ बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 

४. मिक्सरवर आलं-मिरची-लसूण पेस्ट करुन ती पेस्ट, धणेजीरे पावडर, लिंबाचा रस, साखर आणि मीठ घालून हे मिश्रण चांगले एकजीव करायचे. 

५. कटलेट चांगले बांधले जावेत यासाठी ब्रेडचे २ ते ३ स्लाईस मिक्सरमध्ये बारीक करुन या भाज्यांच्या मिश्रणात घालायचे. 

६. हातावर याचे लहान गोलाकार चपटे असे कटलेट थापून घ्यायचे.

७. ब्रेडच्या चुऱ्यामध्ये बुडवून किंवा रव्यामध्ये बुडवून हे कटलेट तव्यावर तेल घालून शॅलो फ्राय करायचे. 

८. लिंबू, साखर, मिरची यांमुळे आंबट-गोड आणि तिखट अशी छान चव असलेले हे कटलेट नुसते खायलाही छान लागतात. नाहीतर हिरवी चटणी, सॉस यांच्यासोबतही चांगले लागतात. 

९. नुसते नको असतील तर ब्रेडच्या भाजलेल्या स्लाईससोबत किंवा पोळीमध्ये घालूनही हे कटलेट खाऊ शकतो. 

१०. भरपूर भाज्या पोटात जात असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे कटलेट हा अतिशय उत्तम पर्याय ठरु शकतो.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.