पूर्वी आसपासच्या गोठ्यातली गाय, म्हैस विणार आहे असं म्हटलं की, आपल्याला चिक मिळावा यासाठी लोकांची फार गडबड उडायची. मग सगळ्यांचे डोळे तिच्या बाळंतपणाकडे लागायचे. एकदा का गाय व्याली की मग मोजून मापून चिक घेऊन यायचा. घरातल्या ज्या बाईला उत्तम खरवस बनविता येतो ती चटकन पुढे येऊन खरवस बनवायला सुरुवात करायची. तो खरवस व्यवस्थितच झाला पाहिजे, कारण जर का त्यात काही बिघडलं तर परत पुढच्या वेळेची वाट पाहायला लागणार. परंतु आजकाल खरवस बाराही महिने मिठाईच्या दुकानात सहज मिळतो. खरवसाचे अनेक प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत. असे असले तरीही, डिशमधल्या चौकोनी तुकड्याची चमच्याने एक एक फोड पाडून खाण्यात जी मज्जा आहे ते फक्त खरवस खाणाऱ्यालाच माहित असते (Kharavas Recipe).
साहित्य -
१. चिक - ५०० मि.ली (Colostrum) २. दुध - १०० मि. ली ३. गुळ - १५० ग्रॅम (किंवा आवडीनुसार)४. वेलची पुड - १ टेबलस्पून ५. जायफळ पुड - १/२ टेबलस्पून ६. मीठ - चिमूटभर ७. केसर - आवडीनुसार
कृती -
१. एका भांड्यात सर्वप्रथम चिक, दूध, वेलची व जायफळ पूड यांचे मिश्रण एकत्रित करून घ्यावे. २. या मिश्रणात गूळ व्यवस्थित विरघळवून घ्या. ३. चवीनुसार मीठ घाला. ४. आवडीनुसार केशराच्या ४ - ५ काड्या घालाव्यात. ५. हे मिश्रण कुकरला लावून १५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावे.
सर्व्ह करताना -
१. खरवस थंड हवा असेल तर त्याला थोडा वेळ रेफ्रिजरेटर करावे. २. सर्व्ह करताना त्याचे आवडीनुसार चौकोनी किंवा त्रिकोणी काप करावेत.
खरवस करताना हे लक्षात ठेवा -
१. खरवस शिजायला ठेवताना कुकरमधील पाणी गार असतानाच त्यात खरवासाच्या मिश्रणाचे भांडे ठेवावे. यामुळे चिक, दूध आणि साखर यांना छान मिसळून येण्यास वेळ मिळतो व खरवस चांगला होतो.