Join us  

घरीच करा हॉटेलसारखा चमचमीत मसाला पाव! तोंडाला पाणी सुटेल, सोपी-झटपट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 2:16 PM

Easy and Quick Restaurant Style Masala Pav Recipe : आपण पावभाजी खायला गेलो की आवर्जून ऑर्डर करतो तो मसाला पाव घरी करण्यासाठी...

सारखे तेच तेच पारंपरिक पदार्थ खाऊन कंटाळा आला की कधीतरी वडापाव, पावभाजी नाहीतर चायनिज, पिझ्झा-पास्ता असं काही ना काही खायची इच्छा होतेच होते. मग एरवी नाही तरी विकेंडला का होईना आपण हे पदार्थ खाण्यासाठी हॉटेलमध्ये नाहीतर एखाद्या ठेल्यावर आवर्जून जातो. पण बाहेरच्या पदार्थांना चव असली तरी त्यांचा दर्जा कितपत चांगला असतो हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे बाहेर खाण्यापेक्षा घरी खाल्लेले केव्हाही चांगले असे आपण ऐकतो, वाचतो. हॉटेलची चव जिभेला गोड लागत असल्याने आपण बाहेर खाण्यालाच प्राधान्य देतो (Easy and Quick Restaurant Style Masala Pav Recipe). 

पण आपण घरीच परफेक्ट हॉटेलस्टाईल पदार्थ केले तर बाहेर खाणेही वाचतो, पैसे तर वाचतातच आणि आपल्याला आपल्या हाताने स्वच्छता राखून केलेला पदार्थ खायला मिळतो. मसाला पाव हा आपण पावभाजी खायला गेलो की आवर्जून ऑर्डर करत असलेला पदार्थ. थोडा झणझणीत तरीही अतिशय चविष्ट आणि खाल्ल्यावर जीभेवर बराच काळ रेंगाळणारा हा पदार्थ म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. पावभाजी भरपूर प्रसिद्ध असली तरी त्यासोबत हा मसाला पाव खाण्यालाही तितकीच पसंती दिली जाते. हा मसाला पाव घरच्या घरी आणि तितकाच चविष्ट कसा बनवायचा ते पाहूया... 

साहित्य - 

१. तेल - १ ते २ चमचे

२. बटर - २ मोठे चमचे 

३. कांदा - १ वाटी (बारीक चिरलेला)

४. शिमला मिरची - १ वाटी (बारीक चिरलेली)

(Image : Google )

५. टोमॅटो - १ वाटी (बारीक चिरलेला)

६. पावभाजी मसाला - १ चमचा 

७. आलं-मिरची-लसूण पेस्ट - १ चमचा 

८. मीठ - चवीनुसार

९. कोथिंबीर - पाव ते अर्धी वाटी (बारीक चिरलेली)

कृती - 

१. सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल घालायचे त्यात बटर घालून दोन्ही चांगले गरम होऊ द्यायचे. 

२. मग त्यावर कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि आलं-मिरची-लसूण पेस्ट घालायची.

३. दोन्ही चांगले परतून घेतले की यामध्ये शिमला मिरची, पावभाजी मसाला आणि टोमॅटो घालून चांगले परतून घ्यायचे. 

४. हे सगळे तेल बाहेर येईपर्यंत चांगले परतायचे आणि पॅनला लागते असे वाटल्यास थोडे थोडे पाणी घालायचे. 

५. सगळ्यात शेवटी यामध्ये पुन्हा थोडे बटर घालायचे आणि पाव घालून हा मसाला पावाला सगळ्या बाजुने एकसारखा लावून घ्यायचा. 

६. आवडीप्रमाणे यामध्ये चीज, कच्चा कांदा, कोथिंबीर घालून हा गरमागरम मसाला पाव खायला घ्यावा. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.