पोहे ही महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध आणि नाश्त्यासाठी अनेकांच्या आवडीची डीश. सकाळी सकाळी गरमागरम कांदेपोहे, त्यावर लिंबू, कोथिंबीर आणि शेव असेल की आपला नाश्ता मस्त होतो. पोटभरीचे आणि झटपट होणारे असल्याने अनेकांकडे तर नेहमीच पोहे केले जातात. मग कधी त्यात फक्त कांदा तर कधी टोमॅटो, बटाटा, मटार असं काही ना काही घालून त्याचा वेगळेपणा टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. पण हे पोहे परफेक्ट झाले तर ठिक नाहीतर त्याची सगळी मजाच जाते. काहीवेळा पोहे जास्त भिजतात आणि मग त्याचा पार गिचका होतो. मग ते खायलाही तितके छान लागत नाहीत.
पोहे मोकळे आणि तरीही मऊ असतील तरच त्याची मजा येते. काही वेळा पोहे कडक भिजले जातात आणि ते फोडणीला टाकले की आणखी कडक आणि वातड होतात. मग ते चावत तर नाहीतच पण ते घशाखालीही उतरत नाहीत. म्हणूनच पोहे परफेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायचं याच्या काही सोप्या टिप्स आज आपण पाहणार आहोत. प्रसिद्ध शेफ पूनम देवनानी यांनी पोहे परफेक्ट होण्यासाठी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या टिप्स शेअर केल्या आहेत. त्या कोणत्या आणि त्यामुळे पोहे मस्त मऊ तरीही मोकळे कसे होतात ते पाहूया...
१. पोहे करण्यासाठी जाड पोहे सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतो आणि मग ते फोडणीस टाकतो. पण यामध्ये आणखी एक गोष्ट केल्यास पोहे एकदम परफेक्ट होतात. ही गोष्ट म्हणजे पोहे धुवून भइजत ठेवताना त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालावं, ते चांगलं एकजीव करावं आणि मग पोहे झाकून ठेवावेत.
२. दुसरीकडे पोह्याला फोडणी दिली की त्यामध्ये आपण कडीपत्ता, मिरची, दाणे, कांदा असं सगळं घालून ते चांगलं परतून घेतो. आणि मग त्यामध्ये पोहे घालतो. मात्र तसे न करता या फोडणीमध्ये थोडं पाणी घालावं आणि मग त्यामध्ये पोहे घालावेत. त्यामुळे पोहे एकदम मऊ होण्यास मदत होते.
३. तसेच तळलेले जाणे, बारीक चिरलेला कांदा आणि मिरचीचे तुकडे फोडणीत न घालता पोह्याच्या वरुन घातले तर पोहे आणखी चविष्ट लागतात. तसंच फोडणीमध्ये बडीशेप घालती तर पोह्याला वेगळाच स्वाद येण्यास मदत होते.