Join us  

थंडीत सारखा चहा प्यावासा वाटतो? करा स्पेशल आयुर्वेदीक चहा, सर्दी-कफासोबत वजनही होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2023 10:47 AM

Easy Ayurvedic Tea Recipe For Winter Season : थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो.

ठळक मुद्देगरम आयुर्वेदिक चहामुळे घशाला आराम मिळतो. सर्दी-कफ कमी होतो आणि वजन कमी होण्यासही याचा फायदा होतो. थंडीत नेहमीच्या चहाला उत्तम पर्याय, करुन पाहा आयुर्वेदिक चहा

थंडीचे दिवस म्हटले की आपल्याला सारखी चहा प्यायची इच्छा होते. हवेत गारठा वाढल्याने गरमागरम चहा घशाला बरा वाटतो. मात्र सारखा चहा पिणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. चहामुळे भूकमोड तर होतेच पण त्यात साखर असल्याने डायबिटीस, लठ्ठपणा असणाऱ्यांसाठीही चहा घेणे चांगले नसते. दिवसभरात अर्धा किंवा एक कप चहा घेणे ठिक आहे. पण काही ना काही कारणाने तुम्ही सतत चहा घेत असाल तर मात्र त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळी आरोग्यासाठी फायदेशीर असणारा आयुर्वेदीक चहा घेतलेला केव्हाही चांगला (Easy Ayurvedic Tea Recipe For Winter Season).

गरम काहीतरी घ्यावसं वाटतं आणि चहा तर घ्यायचा नाही. अशावेळी गरमागरम आयुर्वेदीक चहा हा उत्तम पर्याय ठरु शकतो. थंडीच्या दिवसांत होणारा सर्दी-कफ कमी होण्यासाठी या चहाचा अतिशय चांगला उपयोग होतो. इतकेच नाही तर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर हा चहा उत्तम पर्याय ठरु शकतो. चहा पावडर आणि दूध यांच्याशिवाय होणारा हा चहा चवीलाही अतिशय छान लागतो आणि थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. इन्स्टाग्रामच्या यम्मी रेसिपी खजाना या अकाऊंटवरुन या आयुर्वेदीक चहाची रेसिपी शेअर करण्यात आली असून तो कसा करायचा पाहूया..

 

१. गॅसवर एका पातेल्यात २ कप पाणी उकळायला ठेवायचे. 

२. यामध्ये २ लवंग, आणि १ चमचा आलं आणि मीरपूड घालायचं.

३. बाजारात तयार मीरपूड आणि दालचिनी पूड मिळते. ती नसेल तर आपण घरी मिक्सरवरही या दोन्ही पदार्थांची पूड करुन ठेवू शकतो. दोन्ही पूड १ चिमूट घालायच्या. 

४. हे मिश्रण चांगले उकळायचे म्हणजे मसाल्याच्या सगळ्या पदार्थांचे स्वाद त्यामध्ये उतरतात. 

५. एका कपात काळं मीठ आणि लिंबाचा रस घ्यायचा. 

६. त्यामध्ये हे उकळलेले मिश्रण गाळून घ्यायचे आणि हा चहा गरम असतानाच प्यायचा. 

७. या गरम आयुर्वेदीक चहामुळे घशाला आराम मिळतो. सर्दी-कफ कमी होतो आणि वजन कमी होण्यासही याचा फायदा होतो. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीथंडीत त्वचेची काळजी