रात्रीच्या वेळी घरात कोणी जेवले नाही किंवा कमी जेवले की हमखास उरणारी गोष्ट म्हणजे पोळ्या. मग सकाळी याच पोळ्या आपण गरम करुन चहासोबत खातो, कधी त्याचा खाकरा करतो नाहीतर फोडणीची पोळी ठरलेलीच. कधीतरी गुळ-तूप पोळीचा लाडूही करतो. मात्र हे सगळे खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण याच पोळ्यांचे ३ हटके पदार्थ पाहणार आहोत. त्यामुळे शिळ्या पोळ्या वाया तर जाणार नाहीतच पण त्याचे चविष्ट पदार्थ केल्याने ब्रेकफास्टही मस्त होईल. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया हे खास शिळ्या पोळ्यांचे ३ भन्नाट प्रकार सांगतात. आपल्या यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी या रेसिपीचा व्हिडिओ शेअर केला आहे. पाहूया या रेसिपी कोणत्या आणि त्या कशा करायच्या (Easy Breakfast Recipes from Leftover Roti's).
१. कटलेट
पोळ्यांचे लहान तुकडे करुन ते मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचे. त्यानंतर यामध्ये उकडलेले बटाटे, मटार, किसलेले गाजर, बीट, कोबी अशा घरात असलेल्या कोणत्याही भाज्या घालू शकतो. त्यानंतर यामध्ये मीरपूड, तिखट, मीठ, गरम मसाला, सॉस घालून चांगले मळून घ्यायचे. याचे एकसारखे गोळे करुन त्यामध्ये थोडे चिज घालायचे. मैद्याची पोस्ट तयार करुन घेऊन त्यामध्ये हे कटलेट डीप करुन नंतर ब्रेडच्या बारीक चुऱ्यामध्ये हे कटलेट डीप करायचे. त्यानंतर तव्यावर तेल घालून हे कटलेट शॅलो फ्राय करायचे.
२. नूडल्स
लहान मुलं किंवा घरातील मोठ्यांनाही नूडल्स हा प्रकार चांगलाच आवडतो. मात्र मैद्याच्या नूडन्सपेक्षा शिळ्या पोळीचे नूडल्स फार छान होतात. पोळ्यांचे एकसारखे सरळ नूडल्सप्रमाणे कात्रीने काप करुन घ्यायचे. पॅनमध्ये तेल घालून त्यात बारीक चिरलेले आलं, लसूण आणि मिरची घालावी. हे चांगले परतल्यावर त्यामध्ये कोबी, शिमला, गाजर अशा उभ्या चिरलेल्या भाज्या घालाव्यात. त्यानंतर यामध्ये पोळीचे काप घालावेत. मीठ, मीरपूड, सोया सॉस, व्हिनेगर आणि टोमॅटो सॉस घालून हे चांगले परतावे. या नूडन्स गरमागरम खायला घ्याव्यात.
३. भजी
आता शिळ्या पोळीपासून भजी कशी होणार असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर हा पदार्थ अतिशय सुंदर होतो. उकडलेला बटाटा स्मॅश करुन त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, तिखट, चिली फ्लेक्स घालावेत. बेसनाचे पीठ घेऊन त्यामध्ये मीठ, तिखट, ओवा, हळद घालून हे पीठ भज्यासाठी भिजवतो तसे घट्टसर भिजवावे. पोळीचे त्रिकोणी तुकडे करुन त्यावर बटाट्याचे मिश्रण पसरवावे आणि हे दोन्ही डाळीच्या पीठात बुडवून तळून काढावे.