Join us  

चुरमुऱ्याचा खमंग भडंग करण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 9:30 AM

Easy churmura Bhadanga Recipe : हा भडंग मधल्या वेळच्या खाण्यासाठीही चांगला पर्याय ठरतो.

दुपारी जेवण झाल्यावर संध्याकाळी काही वेळा आपल्याला भूक लागते. अशावेळी आपण चहा बिस्कीट घेतो पण त्यामुळे भूक मरते. भुकेच्या वेळी बरेचदा संध्याकाळी बाहेर वडापाव, चाट, सामोसा असेही काही ना काही खाल्ले जाते. पण असे बाहेरचे काही खाण्यापेक्षा घरच्या घरी काही हेल्दी पर्याय असल्यास केव्हाही चांगले. चुरमुऱ्याचा भडंग हा पर्याय करायला सोपा आणि भुकेच्या वेळी भेळीसारखा करुन खाल्ल्यास पोटभरीचाही होतो. हा भडंग मधल्या वेळच्या खाण्यासाठीही चांगला पर्याय ठरतो. चुरमुरे आणलेले असल्यास यासाठी बाकी जास्त काही सामान लागत नाही. भडंग हा खमंग आणि कुरकुरीत असल्याने संध्याकाळच्या खाण्यासाठी चमचमीत पर्याय होऊ शकतो. हा भडंग करण्याची झटपट आणि सोपी रेसिपी पाहूया (Easy churmura Bhadanga Recipe)...

१. चुरमुरे कढईत घालून  कोरडेच मध्यम आचेवर परतून घ्यावेत आणि मग परातीत काढून घ्यावेत.

२. त्याच कढईत तेल गरम करुन त्यात शेंगदाणे लालसर तळून घ्यावे, हे तळलेले शेंगदाणे चुरमुऱ्यावर घालावेत.

३. यामध्ये  मेतकुट आणि लाल तिखट घालून हलक्या हाताने मिक्स करावे.

(Image : Google)

४. शेंगदाणे तळून उरलेल्या तेलात मोहरी आणि हिंग घालून फोडणी करावी. त्यात हळद, लाल तिखट, लसूण आणि कढीपत्ता घालावा. 

५. या फोडणीमध्ये चुरमुरे घालून त्यात पिठीसाखर आणि मीठ घालून झाऱ्याने एकजीव करावे. 

६. गॅस बंद करुन भडंग गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवावा. 

७. संध्याकाळी भुकेच्या वेळी या भडंगावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, बारीक शेव घालून हा भडंग छान लागतो.  

८. आवडीनुसार या भडंगामध्ये लसूण, कडीपत्ता, डाळं, खोबऱ्याचे काप घालू शकता. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.