Join us  

वाटीभर सुक्या खोबऱ्याची करा झणझणीत चटणी, तोंडी लावण्यासाठी म्हणून परफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 4:59 PM

How To Make Dry Coconut Chutney At Home : जेवताना तोंडी लावण्यासाठी जर सुक्या खोबऱ्याची झणझणीत चटणी असेल जेवणाचा बेत होतो झक्कास...

जेवताना तोंडी लावण्यासाठी आपल्या ताटात अनेकदा आपण पापड, लोणचे, चटण्या वाढून घेतो. आपल्या प्रत्येकाच्याच घरी चटणीचे वेगवेगळे प्रकार केले जातात. ओली व सुकी अशा दोन्ही प्रकारच्या चटण्या आपण प्रचंड आवडीने खातो. तिळाची, शेंगदाण्याची, खोबऱ्याची चटणी महाराष्ट्रात अत्यंत फेमस आहे. चटणी ताटात पडताच साध्या जेवणाची रंगत दुपट्टीने वाढते आणि जेवणारा व्यक्ती दोन घास जास्तीचे आवडीने खातो. जर आवडीची भाजी ताटात नसेल तर आपण चटणीसोबत चपाती, भात फस्त करतो(Dry Coconut Chutney Recipe).

ही सुक्या खोबऱ्याची चटणी भाकऱ्या, चपाती किंवा अगदी साध्या वरण - भातासोबत देखील चांगली लागते. सुकं खोबरं जस दिर्घकाळ टिकतं तशीच ही चटणी देखील एकदा बनवली की वर्षभर चांगली टिकते. जेवताना तोंडी लावला जाणारा चटणी हा प्रकार जितका स्वादिष्ट तितकाच पौष्टिकही आहे. पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटात तिचे स्थान अगदी कोपऱ्यात असले तरी संपूर्ण जेवणाचा स्वाद ही चटणीच वाढवते. ओल्या खोबऱ्याची चटणी तर आपण नेहमीच करतो, पण सुक्या खोबऱ्याच्या चटणीच्या चवीची बातच काही और आहे. संपूर्ण जेवणाचा स्वाद वाढवणारी ही सुक्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात(How To Make Dry Coconut Chutney At Home).

साहित्य:- 

१. सुकं खोबरं - १ कप (किसलेलं खोबरं) २. लसूण - १० ते १२ पाकळ्या ३. लाल सुक्या मिरच्या - ५ ४. जिरे - १ टेबलस्पून ५. मीठ - १ टेबलस्पून ६. साखर - १ टेबलस्पून ७. लाल मिरची पावडर - १/२ टेबलस्पून 

कृती :- 

१. सर्वातआधी एक पॅन घेऊन त्यात किसलेलं सुकं खोबरं, लाल सुक्या मिरच्या, लसूण, जिरे कोरडे भाजून घ्यावे. २. हे सगळे जिन्नस कोरडे भाजून घ्यावेत, सुक्या खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग आल्यावर गॅस बंद करून हे मिश्रण एका डिशमध्ये काढून घ्यावे. ३. आता हे मिश्रण थोडे गार होऊ द्यावे, त्यानंतर हे सगळे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यावे. ४. मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले मिश्रण घातल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, साखर, लाल मिरची पावडर घालावी.५. आता हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये किंचित जाडसर वाटून घ्यावे. 

हॉटेलसारखी ग्रेव्ही घरी करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी, ग्रेव्हीचा रंग - चव एकदम परफेक्ट.... 

सुक्या खोबऱ्याची झणझणीत चटणी खाण्यासाठी तयार आहे. 

पावसाळ्यात गरमागरम भजी, वडा किंवा इतर स्नॅक्ससोबत तोंडी लावायला म्हणून आपण ही चटणी सर्व्ह करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृती