Join us  

मधल्या वेळेच्या भुकेसाठी कुरकुरीत-खमंग चकली, १० मिनीटांत मुलांच्या आवडीचा खाऊ तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2024 1:58 PM

Easy Crunchy Chakli making at home Recipe : चकल्या विकत आणण्यापेक्षा झटपट होणारी अशी चकली घरीच करुन पाहूया...

लहान मुलांना पोळी-भाजी किंवा एखादा पौष्टीक लाडू दिला तर तो नको असतो. पण सतत चविष्ट किंवा कुरकुरीत काहीतरी दे म्हणून तगादा लावतात. वेफर्स, चिवडा, चकली हे तर मुलांच्या आवडीचे पदार्थ. पण पॅकेट फूडमध्ये पदार्थ टिकण्यासाठी काही घटक घातले जातात. तसेच विकतचे तेलही काही वेळा बाधण्याची शक्यता असते. अशावेळी मुलांना घरच्या घरीच त्यांच्या आवडीचा खाऊ करुन दिला तर. मग मुलं बाहेरचे किंवा पॅकेट फूड खाण्याचा आग्रह धरत नाहीत (Easy Crunchy Chakli making at home Recipe). 

चकली म्हणजे दिवाळीच्या फराळातील एक पदार्थ, पण हे गणित आता काहीसे मागे पडले आणि चकली वर्षभर बाजारात मिळू लागली आणि घरोघरी आणली जाऊ लागली. चकली ही भाजणीचीच हेही समीकरण आता बदलले आणि  तांदळाची, मैद्याची, मूगाच्या डाळीची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या बाजारात मिळू लागल्या. अशा चकल्या विकत आणण्यापेक्षा अगदी झटपट होणारी अशी ही चकली घरीच केली तर? पाहूया घरच्या घरी झटपट करता येईल अशा चकलीची खमंग रेसिपी

साहित्य -

१. तांदळाचे पीठ - १ वाटी 

(Image : Google)

२. डाळीचे पीठ - अर्धी वाटी 

३. तेल - २ ते ३ चमचे 

४. ओवा - अर्धा चमचा 

५. जीरे - अर्धा चमचा 

६. तिखट - १ चमचा 

७. तीळ - १ चमचा 

८. हळद - पाव चमचा 

९. हिंग - चिमूटभर

१०. मीठ - चवीप्रमाणे 

११. तेल - २ वाट्या (तळण्यासाठी)

कृती -

१. तांदळाचे पीठ, डाळीचे पीठ आणि इतर मसाल्याचे सर्व घटक एकत्र करायचे. 

२. तेल गरम करुन मोहन या मिश्रणात घालायचे. 

(Image : Google)

३. एकीकडे गॅसवर पाणी उकळून घ्यायचे आणि ते पाणी यामध्ये अंदाज घेऊन थोडे थोडे घालायचे. 

४. पीठ चांगले एकजीव करुन घट्टसर मळायचे.  

५. मग चकलीच्या सोऱ्याला तेल लावून त्यामध्ये या पीठाचे गोळे घालायचे आणि आपल्या आवडीच्या आकाराच्या चकल्या करायच्या.

६. दुसरीकडे गॅसवरील कढईत तेल घालून ते चांगले तापवून चकल्या खमंग तळून घ्यायच्या. 

७. चकल्या पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवायच्या. 

८. या चकल्या १५-२० दिवस मस्त कुरकुरीत राहतात आणि चविष्ट असल्याने सगळ्यांना खूप आवडतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.